फेसबुक आणि व्हॉट्सअॅप

'थोडंसं विषयाबद्दल '
            आजकाल सोशल मिडियाचा वापर खुपचं वाढला आहे. आपण तासन् तास त्यांच्या सोबत आहे. उठता-बसता, चालता-बोलता,खाता-पीता प्रत्येक ठिकाणी आता यांचच राज्य. जरी सोशल मिडियाने दुरस्थ संवादाला नवीन दिशा दिली असली तरी आपले वारू मात्र भरकटत चालले आहेत किंवा ते भलतीकडेच उधळत आहेत. या माध्यमांचा  दुरुपयोग वाढत चालला आहे.आज यांच्या मार्फत अनेक गुन्हे घडत आहेत. उदाहरणे अजुन ताजी आहेत.
              खरंतर आपल्याला  या गोष्टींचा वेळीच विचार करावा लागणार आहे की आपण यांच्या किती आहारी जायचं. या माध्यमांचा वापर किती व कसा करायचा हे शेवटी वापरकर्त्यालाच ठरवायचे आहे. शेवटी हि सारी माध्यमेच आहेत त्यांना आपण जसे वापरू तसेच ते वागणार आहेत.म्हणुनच या सोशल मीडिया'चा वापर दोघांनाही (माध्यम आणि वापरकर्ता ) 'सोसेल' एवढाच असावा. 
याच विषयावर ही पुढची कविता. यात जरी फक्त दोघांचा(फेसबुक आणि व्हॉट्सअॅप) उल्लेख असला तरी त्या बरोबर बाकीची माध्यमेही आलीच.
____________________________________________________________________

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ने अवघं आयुष्य बदलुन टाकलं
थोडंसं सुखद, सुसह्य; पण भलतंच अवघड केलं

दुरस्थ संवादाचा मार्ग जरी अजुन जवळ केला
आपुलकीचा ओलावा मात्र  मधेच कुठेतरी उडून गेला

भावनांची जागा "Feeling" ने घेतली, (सु)विचारांची जागा "Status" ने
हसतोही आम्ही "Smilies😂" ने , अन् रडतोही आता "emojis😢" ने

बाकी काही असो, अफवांचं पिक मात्र इथं जोमाने पिकतं
कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्ड च्या खताने क्षणाक्षणाला फुलतं

देवाच्या नावे धमक्यांचा तर रोजचा इथे दरारा
देवालाही ठाऊक नसेल, तो तरी काय करणार म्हणा बिचारा

साहित्य चोरांची तर भलतीच चंगळ आहे
लेखन एकाचं, माध्यम हे , अन् वाहवा! मात्र त्यांची आहे

आता या साऱ्याला  हे दोघेच जबाबदार कसे
यांच्या जोडीने Insta आलं, Tweeter आलं, बाकी सारे ही आले

सगळे कसे पहा एका माळेचेच मणी
पण ही दोन रत्नं मात्र Famous खरी

शेवटी काय हो, एकाच बापाची दोन्ही लेकरं
असेना का, एक स्वत:चं(FB) आणि एक दत्तकपुत्र(WA)

पण काही म्हणा झुकेशराव, तुमच्या लेकरांनी मात्र नाव काढले
बाकी सर्वांना मागं टाकुन, ते पुढे पुढेच राहीले

भलतंच वेड दिलंस तु आम्हा, आता काही सुटका नाही
वरचं सारं कळत असुनही, आता काही वळत नाही

अखेर ही सारी माध्यमच, चालक इथे दुसराच आहे
तो वापरेल तसं, चालवेल तसंच वागणं यांना भाग आहे

आता माझी ही कविता (त्यांच्यावरचीच) , मी त्यांच्याच हाती सोपवत आहे
पाहु पुढे काय होतं, शेवटी आपल्या हाती तेवढंच आहे
________________________________________
- मुक्त कलंदर© (प्रदिप काळे)
_______________________________________________________
©"All Rights reserved"
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.



पाताळ यात्रा, ले.- अनिल ज.पाटील (कादंबरी अभिप्राय)

प्रत्येकाने वाचावे अशीच ही कादंबरी, श्री. वर्तकांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे इतर विज्ञान वा विलक्षण कादंबर्‍या सारखे फक्त कल्पनविलास नसूण त्यास सध्याचे विज्ञान व प्राचीन इतिहास यांचा आधार आहे. जो इतिहास आज आपल्याकडे केवळ दंतकथा मानला जातो व फक्त वेद व पुराणे यातच बंद आहे आणि ते जाणण्याचे कष्ट कुणीच घेत नाही. अनिल पाटील यांनी मूलभूत संशोधन ग्रंथांचा अभ्यास करून ठिकठिकाणी त्यांचे संदर्भही दिले आहेत.
आज अनेक ठिकाणांच्या संशोधनातून रामायण ,महाभारत यांचे पुरावे सापडत आहेत यांमुळे या दंतकथा,वा कल्पनाविलास नसून यात काहीतरी तथ्य आहे स्पष्ट आहे.
लेखकांनी कादंबरीच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची सूची दिली आहे, त्याच बरोबर इंका सभ्यतेतील शब्दांचे संस्कृत व इतर भारतीय भाषेशी साम्य असलेली शब्दसूची दिली आहे. त्याबरोबरच कादंबरीत उल्लेख आलेल्या काही संदर्भाचे फोटोही दिले आहेत.
पौराणिक ग्रंथात उल्लेख असलेल्या "पाताळ लोक " या संकल्पनेवर आधारित कादंबरी आहे. पण त्याबरोबरच भारतवर्ष व दक्षिण अमेरिका यांचा प्राचीन संबंध याचीही माहिती आहे. त्याप्रमाणेच खंडांची पौराणिक ग्रंथात आढळणारी नावे व आताची नावे, अजून काही प्रदेशांची वेद व पौराणिक ग्रंथामध्ये आढळणार्‍या नावांचा व त्यांच्या आताच्या नावांचा संबंध सांगितला आहे.  माया संस्कृती ,इंका संस्कृती, मयासुर, बळीराजा व प्राचीन भारतीय संस्कृती यांचाही संबंध सांगितला आहे.काही ठिकाणी थोडंसं अतिशयोक्ती वाटेल बाकी वाचल्या नंतर कळेलच.
अनिल पाटील यांनी त्यांना पौराणिक ग्रंथातील गवसलेला हा अतिप्राचीन इतिहास कादंबरीच्या स्वरुपात थोडासा रंजक पद्धतीत सांगितला आहे.
त्यामुळे प्रत्येकाने विशेषतः या विषयात आवड असणार्‍यांनी तर एकदा अवश्य वाचावी अशीच ही कादंबरी आहे. बाकींनी एक रंजक व विलक्षण कथा म्हणुन वाचण्यास काहीच हरकत नाही.


-मुक्त कलंदर

_______________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

रावतेंचा पछाडलेला वाडा.-ले. नारायण धारप व डॉ.अरुण मांडे.( अभिप्राय)



            मागे काही दिवसापूर्वी “Narayan Dharap- नारायण धारप  या नावाने नारायण धारप यांच्या चाहत्यांच्या फेसबूक पेजवर ही कथा वाचण्यास मिळाली. हे परीक्षण वगैरे नसून वाचक या नात्याने हा माझा या कथेविषयीचा अभिप्राय आहे. लेखकांनी लिहावं,परीक्षकांनी परीक्षण करावं तर वाचकाने त्या कथेचा वा साहित्याचा आस्वाद घ्यावा व त्या साहित्य प्रवासातील आपला अनुभव अभिप्राय स्वरुपात द्यावा अस मला वाटतं.
          आपल्या इथे भयकथा,गूढकथा,विज्ञानकथा,रहस्यकथा यांचा वाचकवर्ग म्हणावं तसा नाही आणि लेखक वर्गही कमीच. अलीकडे अनेक हिन्दी चित्रपटांमधून हा भयकथांचा विषय हाताळण्यात येतोय पण त्यातही मूळ कथानकापेक्षाही शृंगारीक प्रसंगावरच जास्त भर दिला जातो व याचच वाईट वाटतं. आणि काही दाक्षिणात्य चित्रपटातूनही हे विषय चांगले हाताळले गेले पण अलीकडे त्यांनीही भयपटाचे विनोदपट करून ठेवले. हॉलीवूडने मात्र या विषयात काही खूपचं अप्रतिम चित्रपट दिले जस की द कंजूरिंग सिरिज,द रिंग सिरिज, द एक्सोरसिस्ट सिरिज, इन्सीडुअस सिरिज किंवा मग अलीकडेच आलेला “it”. अजूनही भरपूर नावे सांगता येतील. त्याबरोबरच बाकी विषयातही त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. तिकडे या प्रकारचं लेखनही भरपूर झालं आणि वाचकवर्ग ही भरपूर आहे.  
          आपल्याकडे या लेखनाची कसर नारायण धारप,रत्नाकर मतकरी इ. दिग्गज लेखकांनी भरून काढली.अलीकडच्या आणि कदाचित आमच्याही पिढीला नारायण धारप हे नाव नवीनच असेल पण एक काळ त्यांनी आपल्या लेखनाने गाजवला होता. धारपांचा वाचकवर्गही मोठा आहे. धारपांच्या लेखणीच वैशिष्ठ्य म्हणजे, ते पात्र, स्थळ यांच्या वर्णनातून प्रसंग प्रत्यक्षं समोर उभा करत आणि एखाद्या भयप्रसंगाच्या वर्णनात कुठेही किळसवाणे वाटणारे वर्णन नसे पण तरीही तो प्रसंग तेवढाच परिणामकारक असे. आणि त्यांच्या कथांचा शेवट हा नेहमी सकारात्मक असे. दुष्टावर सुष्टाचा विजय, वाईटवर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय. आपल्याला नेहमी हॅप्पी एंडिंग ची आशा असते आणि तेच त्यांच्या कथांमध्ये असे.               
              आता या कथेबद्दल, ही धारपांची अपूर्ण राहिलेली कथा. नंतर डॉ. अरुण मांडे सरांनी ही पूर्ण केली, आणि “Narayan Dharap-नारायण धारप” या फेसबूकपेजवर पूर्वपरवानगीने ही कथा प्रकाशित करण्यात आली.एक भयकथा,गुढकथा व रहस्यकथा प्रेमी व त्यातही धारप प्रेमी त्यामुळे नारायण धारपांच्या जितक्या मिळतील तितक्या कथा वाचवयास मिळणे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट कुठली असेल.
              डॉ. अरुण मांडे सरांनी हे शिवधनुष्य अगदी सहज पेललं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे  या धनुष्याला प्रत्यंचा लावताना धनुष्य भंग न पावता प्रत्यंचाही अलगद बसवला. म्हणजेच कथेची लय कुठेही बिघडू न देता व धारप सरांच्या शैलीला कुठेही धक्का न लावता ही कथा पूर्ण केली. कुठल्याही दोन गोष्टींमध्ये तुलना करणे हा मानवी स्वभावच आहे. आपल्याही नकळत आपण आपण ती करू लागतो, पण खरेतर इथे ही कथा दोन लेखकांनी लिहल्यासारखे वाटतच नाही.मांडे सरांनी कथेला अगदी योग्य न्याय दिला आहे.
             आता धारप सरांच्या मनात या कथेचा काय प्लॉट होता हे कदाचित सांगता येणार नाही.पण मांडे सरांनी जो प्लॉट devlope केला आहे तोही खूपच उत्कृष्ट आणि धारप शैलीला साजेशा आहे. ही कथा मोजक्याच पात्रात रेखाटली आहे. ती कुठल्याही एका पात्राभोवती घुटमळत नाही तर प्रत्येक पात्राची आपली एक वेगळी ओळख आहे अगदी लहानग्या पारू म्हात्रेचीहि.
           या कथेतील वाड्याचे वर्णन मात्र अगदी उत्तम केले आहे. अगदी प्रत्यक्ष वाडा डोळ्यांसमोर उभा राहिला. त्याबरोबरच कथेतील पात्रांची इतर स्थळांची वर्णनेही बारीकतेने केली. इतर पात्राप्रमाणे वाड्यातील दुष्ट शक्तींच्या वास्तव्यामुळ वाडा ही एक पात्रच बनला आहे. वाड्यातील त्या शक्तीचा इतिहासही कुठेही अवास्तव न दाखवता अगदी मोजका पाहिजे तेवढाच सांगितला आहे. तसे पहिलं तर या कथेत शेवट सोडला तर मोजक्याच अमानवीय घटना घडल्या पण त्याही कथेवर छाप पाडणार्‍या व लक्षात राहतील अशाच आहेत. कथा कुठेही जास्त ताणून न धरता एकाच लयीत पूर्ण केली आहे आणि गतीही कुठे कमी वा जास्त होत नाही. इतर धारप कथेप्रमाणे या कथेचा शेवटही सकारात्मक झाला आहे हे विशेष. हे सगळे पाहता ही कथा अगदी उत्तम जमून आली आहे. बाकी जास्त काही लिहीत नाही कारण स्वतः कथा वाचण्याचा अनुभव हाही निराळाच असतो आणि तोच प्रत्येक वाचकाने घ्यावा.त्यामुळे वाचावीच अशी कथा आहे. शेवटी काय प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा भाग.

-मुक्त कलंदर(प्रदिप काळे). 
____________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

एकांत-संध्येच्या छटा

मावळतीकडे झुकलेला दिनकर
त्याची लाली स्वत:मधे मिसळणारा अथांग जलधी,
एका पाठोपाठ एका लयीत धावणार्या त्याच्या लाटा,
त्यांच्याशी पाठशीवण खेळणारा किनारा,
त्या किनार्यावर बसलेला मी,
आणि माझ्यासोबत फक्त तु...

हे एकांता,
कदाचीत आपली सर्वांचीच काहीतरी जुनी वीण असावी,
नाहीतरी उगाच का? या अशा संध्येला
मला तुझी ओढ, तुला किनार्याची,
किनार्याला लाटांची, आणि लाटानांही या संध्येची...
(एकांत-संध्येच्या छटा©)
"मुक्त कलंदर©."(प्रदिप काळे)
________________________________________________________

©"All Rights reserved"
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected