Showing posts with label Fiction. Show all posts
Showing posts with label Fiction. Show all posts

अनाकलनीय

             

                   सुरूवात कुठून करावी कळत नाहीये. परंतु हे सगळं जे माझ्या बाबतीत घडतयं याची नोंद हवी. त्यापेक्षाही महत्वाचं हे कुणाला तरी सांगायला हवं, पण ऐकल्यानंतर समोरच्याने समजून घेण्यापेक्षा वेड्यात काढण्याचीच शक्यता जास्त. म्हणून हे लिहुन ठेवायचं ठरवलं आहे. पण खरंच नक्की सांगायचं कुठुन; कारण याची सुरुवात कधी झाली ते माहीत नाही. की...? माझ्या बाबतीत असं घडतंय हे मला समजलं तेव्हापासून सांगु? खरंतर तुमचा विश्वास बसणार नाही, माझाच बसला नव्हता.पण शेवटी हे सगळं माझ्याच सोबत घडतंय, आणि पुन्हापुन्हा घडतंय. सुरवातीला वाटलं, असेल काही योगायोग पण नाही;  वारंवार घडतंय त्याला योगायोग कसं म्हणायचं.आता हे कसं सांगायचं तेदेखील मला कळत नाहीये. कुणाविषयी चांगलं बोलायची सोयच राहिली नाही हो! पण कुणालातरी हे सांगायलाच हवं त्याशिवाय मला शांती लाभणार नाही. पुन्हा तरी लाभेल की नाही कुणास ठाऊक? पण सांगायला हवं. मी परतपरत तेच बरळतोय. काहीच कळत नाहीये मला.काय होतो मी आणि काय झालोय मी ? माझं सारं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. सारं काही सुखात, आनंदात चाललं होतं. कुणालाही हेवा वाटेल असं आयुष्य होतं. पण हे असं  भयानक वळण मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. नाही! आता सांगायला सुरुवात केलीच आहे तर अगदी पहिल्यापासून सांगतो, उगाच मधुन कुठेतरी शिरायला नको.

               तर माझं नाव.....  नको तसंही जे घडतयं त्याचा नावाशी काहीच संबंध नाही,  आणि असला तरी त्याने काय फरक पडतो म्हणा. माझा जन्म इथलाच. माझे वडील, आजोबा, पणजोबा सगळे इथंच जन्मले आणि इथल्याच मातीत मिसळून गेले.पण हे आमचं मुळ गाव नसलं तरी आता तेच आहे. वडिल सांगायचे, खुप पुर्वी आमचा कुणीतरी पुर्वज इथं आला आणि त्यानं हा गाव वसवला. त्याला आता कैक पिढ्या उलटल्या. असो याचाही काही संबंध नाही. 

            घरची परिस्थिती उत्तम होती. कशाचीही ददात नाही. वडिल प्राध्यापक, घरची वडिलोपार्जित बागायती जमीन, रहायला चांगलं दोन मजली पक्क घर. कशाचीही कमतरता नाही.   अजुन काय हव आयुष्यात. कुणालाही हेवा वाटेल. माझं प्राथमिक शिक्षण याच शहरात झालं. पुढील शिक्षण एका नामांकित महाविद्यालयात झालं. सगळे छंद जोपासले. लिहायची आवडं, तसंच वक्तृत्व ही चांगलं आहे. पदवी मिळाली. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतलं. वडील शिक्षक, मलाही तेच आवडायच म्हणून मीही एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो.९-५ ची घराजवळची नोकरी, दिनदर्शिकेत लाल रंगाची तारीख आली कि हमखास सुट्टी. मग कुठेतरी फिरायला जायचं. 

           पुढे लग्न झालं. आपल्याला लहानपणापासून आवडणारी मुलगी पत्नी म्हणून मिळनं यासारखं दुसरं भाग्य नाही. पुढे काही वर्षात एक मुलगा, एक मुलगी. सारं अगदी आधिच ठरवल्यासारखं सहज आणि विनासायास. कधी कुणासमोर हात पसरायची वेळ आली नाही की कुणाशी कधी वाद नाही. म्हणजे आयुष्य सरळ आणि आनंदात चाललेलं असताना कुठे माशी शिंकली काय माहीत?

            हे माझ्यासोबत घडतंय याची जाणिव मला साधारण काही महिन्यांपूर्वीच झाली. याआधी असं काही घडलं असेल तर ते आठवत नाही. तर झालं असं माझा मुलगा. मी इथं कुणाच्याही नावाचा उल्लेख करणार नाही, बदलुन सुद्धा. तर तो  त्यावेळी आठवीत होता. लहानपणापासून हुशार. कायम टॉप रॅंकमधे. आणि मुलगी असेल सहावीला. तीला गायनाची आवड. माझे मित्रमंडळी, पाहुणे यांच्याकडे मी कायम माझ्या मुलांची स्तुती करायचो.  माझी मुलं अशी, माझी मुलं तशी. त्यांना हे आवडतं- ते आवडत नाही वगैरे वगैरे. एकुण काय तर  आपल्याच पोरांची स्तुती करायला आपल्याला कुणाच्या बापाची भीती, नाही का?

               खुपचं अघळपघळ होतंय ना? पण काय करणार सांगायचं ठरवलंच आहे तर..

               तर कुठं होतो आपणं...अं...?  हं... काही महिन्यांखालचीच गोष्ट. आमच्या हीचे कुणीतरी नातेवाईक नुकतेचं या शहरात रहायला आले होते.आणि त्यादिवशी आम्ही त्यांना जेवणाकरता बोलायला होतं. तर चहापाणी झालं आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो त्यांची मुलं आणि माझी मुलं खेळत होती सहज विषय मुलांच्या शिक्षणावर आला आणि मी जी माझ्या मुलांची स्तुती चालू केली. कदाचित त्या पाहुण्यांना सुद्धा विचित्र वाटलं असेल पण आपल्याला कुणाच्या बापाची भीती नाही का? हे झालं आणि त्याच्यानंतर काहीच दिवसानंतरची गोष्ट असेल खूपच वाईट घटना घडली माझी मुलगी जी गायन शिकत होती तिचा अचानक घसा बसला. तुम्ही म्हणाल घसा बसणं ही काय तितकी वाईट गोष्ट नाही आज ना उद्या चांगला होईलच की. उपचार सुरू होते, फरक पडेना, नंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून काही टेस्ट केल्या आणि रिपोर्ट आला की तिला थ्रोट इन्फेक्शन झालं आहे आणि कदाचित त्यामुळे तिच्या आवाजात बदल पडू शकतो, त्यामुळे भविष्यात याचा परिणाम तिच्या गायनावर पडू शकतो. हा धक्का बसतो न बसतो तोच काही दिवसात आमच्या चिरंजीवांकडून कडून एक धक्का बसला. महिन्याभरापूर्वीच सहामाही परीक्षा झाल्या होत्या आणि त्याचा रिझल्ट आला तर आमच्या चिरंजीवांची एका विषयात विकेट उडाली होती आणि कहर असा की जो विषय मी शिकवत होतो म्हणजे इतिहास त्यात चक्क तो काठावरती पास झाला होता. पण मी विचार केला की, डोक्यात जरा हुशारपणाची हवा वगैरे शिरली असेल आणि त्यात ती सहामाही होती आणि तिही आठवीची म्हणून जास्त काही बोललो नाही.

             पण नंतर एक अशीच घटना घडली. मी नववीच्या वर्गाला इतिहास शिकवायचो माझ्या क्लास मधला एक हूशार विद्यार्थी अभ्यासात हुशार तसाच इतर ऍक्टिव्हिटी मध्येही. तर सहामाही नंतर पालक मिटींग होती. सहामाहीला त्याचा रिझल्ट खूप चांगला आला होता म्हणून त्याच्या पालकांसमोर त्या मीटिंगमध्ये त्याची खूप स्तुती केली. मग काय पालकही खुश. पण सहामाही नंतर येणाऱ्या घटक चाचणी परीक्षेत तो चक्क नापास होता होता राहिला आणि विचार करण्याची गोष्ट म्हणजे माझ्या क्लास मधला दुसरा विद्यार्थी जो आज पर्यंत काठावर पास व्हायचा सहामाहीला त्याचे दोन विषय राहिले आणि त्याच्या वडिलांसमोर मी त्याची खरडपट्टी काढली तो चक्क चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. माझा विश्वास बसत नव्हता पण शेवटी त्यातला माझ्या विषयाचा पेपर मी स्वतः तपासला होता आणि तिथे तीच परिस्थिती होती. या साऱ्या घटनांत वेळेचं अंतर असल्याने त्या वेळी मला जास्त काही जाणवलं नाही आणि जास्त विचारही केला नाही. पण यानंतर मात्र एका पेक्षा एक विलक्षण घटना घडू लागल्या आणि हे इतरांना जरी जाणवलं नाही तरी मला आता हळूहळू जाणवू लागला होतं.कुणाचं कौतुक करायला जावं तर त्याच्या उलटच घडु लागलं. कुणाच्या सुंदरतेची स्तुती करावी तर काही कारणाने त्यांच्यात बदल. स्लिम ॲंड ट्रीम फिगरसाठी बायकोची तारीफ करावी तर पुढील काही महिन्यात तिची फिगर बिघडली. कधीच कुणासोबत असं घडलं नसेल ईतकं विचित्र घडत होतं. 

               एकदा माझा एक शिक्षकमित्र, त्याचा वाढदिवस होता. तो माझा अत्यंत जवळचा मित्र. तुझा कुणी बेस्ट फ्रेंड आहे का? असं जर मला कुणी विचारलं तर मी याचंच नाव घेईन. अगदी शांत, तल्लख , सर्वात मिसळणारा, प्रत्येकाशीच खुल्या मनाने वागणारा, अजातशत्रू असा हा माझा मित्र. तर त्यादिवशी त्याने एक छोटी पार्टी आयोजित केली होती. आम्हा सर्वांनाच कुटुंबासह आमंत्रण होतं. केक कापायच्या आधी प्रत्येकजण त्याच्याविषयी स्तुतीपर दोन शब्द बोलु लागले. माझी बारी आली, तो माझा जवळचा मित्र; मग काय एक लांबलचक भाषणंच ठोकलं. पार्टी झाली. त्यानंतर काही दिवसांनी एक गोष्ट जाणवली हा माझा मित्र जरा विचित्र वागु लागला. तो माझ्याशीच नव्हे तर प्रत्येकाशीच तुटक वागु लागला. माझी तर तो भेटही घेत नव्हता. मी माझ्या पत्नीला सांगुन तिला त्याच्या पत्नीला कॉल करुन विचारायला लावलं तर घरीही तिच परिस्थिती. कुणाशी निट बोलणं नाही, थोड्या थोड्या गोष्टींवरुन त्रागा करत होता. मी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला लावली. पण पुढच्या दोन दिवसातच तो कुणालाही न सांगता सारं गुंडाळून गावी निघून गेला. हे सर्व फक्त पंधरा दिवसात घडलं. पुन्हा तर त्याने माझा फोनसुध्दा उचलला नाही. त्याच्या पत्नीने तिच्या शेजारी सांगुन ठेवल्याने हे समजलं.

              या घटनेनंतर माझ्या मनात या काही महीन्यात घडलेल्या गोष्टींची आपोआप उजळणी होऊ लागली. मला तरीही खात्री वाटत नव्हती. परंतु हे सर्व योगायोगाने तर घडणारं नव्हतं. आणि या सगळ्यात एकच कॉमन गोष्ट होती ती म्हणजे मी. पण आता बराच उशीर झाला होता. खुप साऱ्या अघटीत घटना घडल्या होत्या आणि याला जबाबदार कोण तर फक्त मी. आता हे कुणाला सांगावं तर त्याने विश्वास ठेवण्याऐवजी मलाच वेड्यात जमा केलं असतं. नाहीतर साऱ्या गोष्टींचं खापर माझ्या माथी मारत गावभर बोभाटा केला असता.काय करावं काहीच कळत नव्हतं.हा सगळा मनाचा खेळ म्हणावं तर वेळोवेळी प्रत्यय येत होता. आणि हे फक्त माणसांच्या किंवा सजीवांच्या बाबतीतच होत होतं असं नाही, तर निर्जीव वस्तूंबाबत पण तेच. 

               त्यादिवशी आमच्या शेजारचे काका, त्यांनी नवीन चारचाकी खरेदी केली. माझ्या मागेच लागले की तु एकदा चालवून बघ आणि कशी वाटते ते सांग. शेवटी नाईलाजाने मी त्यांना सोबत घेऊन एक चक्कर मारली. त्यांना म्हणल काका छान आहे गाडी, कंफर्टेबल, इंजिन क्षमता वगैरे. आता त्यांना कौतुक ऐकायचं होतं आणि गाडीही चांगली होती म्हणून केलं कौतुक. दुसऱ्याच दिवशी गाडीला पार्क केलेल्या जागेवरच कुणीतरी त्याची गाडी वळवताना ठोकली आणि तीही पुढल्या बाजुने. झालं निघालं इंजिनकाम. भले त्यांचा विमा होता आणि याला प्रत्यक्ष मी जबाबदार नसलो तरी जे होतं ते मलाच माहीत होतं. 

               शेवटी ठरवलं कि आजपासून कुणाचीही स्तुती करायचीच नाही. आपल्यामुळं कुणाचं वाईटही नको आणि नुकसानही नको. पण आता तुम्हीच सांगा एखादी कौतुकास्पद गोष्ट पाहीली की आपल्या तोंडून आपल्याही नकळत कौतुकाचे शब्द बाहेर पडतातचं पडतात. ते आपणही रोखु शकत नाही.आणि काही वेळा समोरच्यालाही आपल्याकडुन त्याची अपेक्षा असते.

                एकदा शाळेत साहित्य सप्ताह होता. त्यानिमित्त माझ्या एका कवीमित्रालाच आमंत्रित केलं होतं. तो पुर्वीचा माझा वर्गमित्र होता. खुप दिवसांनी आमची त्यादिवशी भेट झाली होती. कार्यक्रम एकदम मस्त झाला. मलाही कवितांची आवड आहे. कार्यक्रम झाला आणि आम्ही सर्वजण स्टाफरुम मधे एकत्र बसून कार्यक्रमाची चर्चा करत होतो. त्यात तोही होताच. सगळ्यांनी त्याची स्तुती केली केली. त्यात तो माझा मित्र होता मग मलाही थोडं मांस चढलं होतं, आणि सगळ्यांबरोबरच मीही त्याच्या कवितांची स्तुती केली. त्यानंतर महिना-दीड महीनाच झाला असेल. त्याची आणि माझी रस्त्यात गाठ पडली. हाय-हेल्लो झालं, मग तिथंच एका हॉटेलमध्ये चहासाठी गेलो. गप्पा सुरू झाल्या. इकडचं-तिकडच झाल्यावर विषय कवितांवर आला. मी सहजच म्हंटलं,

" काय मग कवी महाराज काही नवीन असलं तर ऐकवा की!"

तसा त्याचा चेहरा पडला, पण पुढच्याच क्षणी उसणं  हसु आणत म्हणाला,

"काय नाही यार, आता महीण्याच्या वर झालं पण नवीन अक्षरही लिहिलं नाही की सुचलं नाही. पुर्वी रोज नसलं तरी दोन-तीन दिवसाला काहीना काही सुचवायचं, पण आता पेन घेऊन बसलं की उगाच कागदावर रेघोट्या मारत बसतो. सुचतंच नाही काही."

तसा मी मनात चरकलो.

“अरे त्यात काय सुचेल की , ते काय म्हणतात ते क्रिएटिव्ह ब्लॉक का काय असतो तसं असेल काहीतरी, तु उगाच ताण घेऊ नकोस.”

                तो फक्त हसला मीही विषय आवरता घेत काढता पाय घेतला. मी खरंतर बाजारात जात होतो पण तसाच काही न घेता मोकळा तडक घरी गेलो. आता कशातच लक्ष लागत नव्हतं. 

                बरं हे होतं तोवरही ठीक होतं, कारण काही असलं तरी कुणाच इतकंही मोठं नुकसान नव्हतं झालं. माझी मुलगी ती गाऊ शकत नसली तरी बोलु तरी शकत होती. थोड्याफार औषधोपचाराने ती अजुन सुधारेल ही. माझा मुलगा आणि माझ्या वर्गातील तो विद्यार्थी दोघांची गाडीही पुन्हा रुळावर येत होती.  थोडे कष्ट पडतील पण सुधारतील. कवी मित्राचंही असंच आता नाही सुचत पण सुचणारच नाही असं काही नाही ना? तसही त्याच्या नावावर बर्यापैकी साहित्य होतं. हा… पण एखाद्या कलाकाराची कलाच त्यांच्यापासून दुर होण, यासारखं मोठ दुःख नाही. पण आता वेळ निघून गेली होती. आणि माझा जिवलग मित्र तो माझ्यापासून दुर गेला. पण त्याचं आयुष्य मात्र पार उध्वस्त झालं या दोघांचच खुप वाईट वाटतं. मनाला कितीही समजावलं की या घटनांना दुसरी काहीतरी कारणे असतील पण कितीही समजुत घातली तरी जे दिसत होतं ते सत्य नाकारता येत नाही ना?

              याबाबतीत मानसोपचारतज्ज्ञाची भेटही घेतली. आठवड्यातली प्रत्येक शनिवारची संध्याकाळ तिथंच जात होती. पण प्रत्येक भेटीला गोळ्यांच्या डोसशिवाय काही हाती येत नव्हतं. बरं हे घरीही सांगता येत नव्हतं. गोळ्यांविषयी रोज विचारणा होत होती. ताण वाढत होता. लोकांबरोबर बोलायचीही भीती वाटु लागलीय आता. कारण आज या गोष्टीचा कहरच झालाय. मी पुरता हादरुन गेलोय. आता काय करावं काहीच सुचत नाहीये. आजवर कुणाचं ईतकं मोठ नुकसान झालं नव्हतं. पण आज याची हद्द झालीय. 

              कालच शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता, आणि मी नको म्हणत असतानाही कार्यक्रमाच्या प्रस्तावनेची जबाबदारी माझ्यावर आली. नको म्हणायला मला ठोस कारणही देता येईना. आता पाहुण्यांची ओळख करुन द्यायची म्हटल्यावर भली मोठी स्तुती करणं आलंच. मी घाबरलोच होतो. कार्यक्रमाचे पाहुणे हे मागच्या दोन महीन्याखालीच निवडून आलेले नगराध्यक्ष होते. मी शेवटी विचार केला की असो एवढं काय मोठं नुकसान होणार आहे, फारफार तर पुढच्या वेळी निवडून येणार नाही. किंवा असंच काहीतरी. काय मोठा फरक पडणार आहे. असा विचार करून मी अशी प्रस्तावना तयार केली की जास्त स्तुतीही वाटु नये आणि पाहुणेही खुष व्हावेत. शेवटी कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने निवांत जाऊन झोपलो. 

               आज सकाळी जरा उशीराच उठलो. अंघोळ वगैरे उरकली. आणि चहा पितपित मोबाईल चेक करू लागलो, तर एका मित्राचे १०-१२ मिसकॉल.  मग त्याला फोन लावला.

"अरे किती कॉल करायचे तुला?" तिकडून तो बोलला.

"अरे आताच उठलोय बोल न, काय झालं? 

आणि त्यानं जे सांगीतलं ते ऐकुण माझ्या पायाखालची जमीनच सरकली. " 

"अरे काल जे नगराध्यक्ष आले होते ना आपल्या कार्यक्रमाला ते पहाटे वारले ,  मी तिकडेच चाललोय अंत्यसंस्कारासाठी. बर ठेवतो गाडी चालवतोय."

               असं म्हणुन त्यानं फोन ठेवला, पण कितीतरी वेळ मी तसाच मोबाईल कानाशी धरुन होतो. माझं डोक सुन्नं झालंय. आणि जे घडलं होतं भयंकर होतं. नोटीफिकेशन टोनने मी भानावर आलो. मी मेसेज उघडला.

" शहरातील युवा नेतृत्व व नगराध्यक्ष श्री. XXXXX यांचा आज पहाटे अज्ञात कारणाने मृत्यू ..."

……….....................................................

कथेतील पात्र, प्रसंग पुर्णपणे काल्पनिक आहेत.

...................................

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील लेखनाचे सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

@ मुक्त कलंदर

______________________________________________

प्रतिमा स्त्रोत : पिक्साबे.कॉम


 

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected