Showing posts with label निळावंती. Show all posts
Showing posts with label निळावंती. Show all posts

निळावंती : एक न उलगडलेले रहस्य

(डिस्क्लेमर : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्यामुळे अंधश्रध्दा वगैरे मुद्यावर वाद घालु नये. या लेखाद्वारे फक्त समाजामध्ये चर्चिल्या जाणार्या काही गुढ व रहस्यमयी विषयासंबंधी लिहले  त्या विषयांमध्ये कुणी किती खोल जायचे व कुणी किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.  अंधश्रध्दा वगैरे विषयांवर वादविवाद करणार्यांनी स्वत:च्या जबाबदारीवरती हा लेख वाचणे.)
         निळावंती हे नाव अनेकांनी अगोदर खुपदा ऐकलं असेल त्यातील काहींनी दंतकथा म्हणुन सोडुनही दिलं असेल. तर काहींसाठी विषय नवीनचं असेल.पण रहस्य, गुढशास्त्र यांची आवड असणार्यांना  "निळावंती" हे नाव काही नवीन नाही.
याची सुरवात कधी झाली हे सांगु शकत नाही, मात्र खुप पुर्वी पासुन मौखिक स्वरुपात या ग्रंथा विषयीची माहीती चालत आली, की हा ग्रंथ वाचल्या नंतर वाचकाला सर्व पशु-पक्षी,किटक व सर्व जीवांची ज्यांचा उल्लेख ८४लक्ष योनींमधे येतो त्या सर्वांची भाषा समजते असं म्हटलं जाते.
या ग्रंथाविषयी अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत तर प्रथमत: ते पाहु.
काहीजणांना निळावंती हा ग्रंथ थोर गणिततज्ञ भास्कराचार्यांनी लिहला असं वाटतं पण तसं नाही कारण भास्कराचार्यांचा ग्रंथ "निळावंती" नसुन "लिलावती" हा आहे. हा गणितविषयक  ग्रंथ असुन भास्कराचार्यांची मुलगी लिलावती च्या नावावरुन आहे. हा ग्रंथ भास्कराचार्य लिखित "सिध्दांत शिरोमणी" या ग्रंथाचा एक भाग आहे.( या लिलावती ग्रंथाची व भास्कराचार्यांच्या इतर लेखनाविषयी विकीपिडीया वरती बरीच माहीती उपलब्ध आहे.) परंतु याच नावाची कुणी दुसरी व्यक्ती असु शकेल हेही नाकारता येत नाही. फक्त सांगण्याचा मुद्दा हाच की "निळावंती" व "लिलावती" हे दोन वेगळे ग्रंथ आहेत.
            अजुन एक निळावंती या नावाचा वन्यजीव अभ्यासक व लेखक  "मारुती चित्तमपल्ली" यांचाही एक कथासंग्रह आहे. याच्याही बाबतीत बहुतेक जण गफलत करतात. पण हादेखिल तो ग्रंथ नाही.
तर मुळ ग्रंथ "निळावंती" हा वेगळा आहे. काहींना हा ग्रंथ अघोरी साधनेचा ग्रंथ वाटतो, काळ्या शक्तींशी निगडित वाटतो.पण तसे पाहता निळावंती हा ग्रंथ अघोरी वगैरे वाटत नाही. या ग्रंथाच्या वाचनाने पशु-पक्षांची भाषा समजते. या ग्रंथाच्या अर्धवट वाचनाने वेड लागतं, मृत्यु येतो असंही म्हणतात. तसं पाहिलतर अर्धवट ज्ञान हे कधीही धोकादायकच असतं. कदाचीत ग्रंथाच्या शेवटी त्या शक्तीला कंट्रोल करण्याचे रहस्य असेल. जसं आजच्या काळात कुठल्याही नवीन वस्तुबरोबर user manual येत तसच काहीसं.
ज्या निळावंतीच्या नावावरुन या ग्रंथाला हे नाव मिळाले तिची कथा जी मी कुठेतरी वाचली होती व जी आजकाल जाला(Internet) वरती फिरते आहे ती थोडक्यात अशी की,
              "निळावंती ही धनवंताची कन्या. तिला पशु-पक्षांची भाषा ज्ञात होती. ती त्यांच्याशी बोलत असे, ते पशु-पक्षी तिला जगात घडणार्या वेगवेगळ्या घटणांविषयी व त्याबरोबरच गुप्तधनाची माहीती सांगत. लग्नानंतर एेके दिवशी मध्यरात्री तिला कोल्हेकुई एेकु आली, त्यावरुन तिला समजले की नदीतुन एक प्रेत वाहत येत आहे. त्या प्रेताच्या कमरेला अमुल्य मणी बांधलेला आहे. ते एेकल्यावर ती तिकडे निघाली. अशा अमानवी शक्ती जवळ असताना त्यासंबंधी समाजामधे उलट-सुलट चर्चा ही होणारच. आणि हीच चर्चा तिच्या पतीच्याही कानी आली असल्यामुळे ती काय करते हे पाहयला तिचा पती ही गुपचुप तिच्या पाठी निघाला. निळावंतीने ते प्रेत बाहेर घेतले व ती कमरेला गुंडाळलेला मणी काढु लागली, पण तो गाठींमध्या बांधला असल्याने, तिला त्या गाठी सुटेनात म्हणुन ती दाताने गाठ सोडु लागली, हे तिच्या नवर्याने पाहीलं व त्याला वाटलं ती प्रेत खातेय वगैरे आणि त्यामुळे ती कुणीतरी चेटकिण वगैरे आहे या कल्पनेने त्याने तिला सोडुन दिले."
                तर अशी ही निळावंती ची थोडक्यात कथा. (माझ्या माहीती प्रमाणे "नवरंग प्रकाशन, कोल्हापुर" यांनी निळावंती याच नावाने एक पुस्तक प्रकाशीत केले ज्यामधे शाहीर हैबतीबुवा पुसेसावळीकर यांनी लिहलेलं निळावंती आख्याण आहे.कदाचित त्यामधुन जास्त माहीती मिळु शकेल. )
            ही निळावंती ची कथा पुढे लोकशाहीरांनी, पिंगळा ज्योतीषांनी आपल्या कवणातुन जिवंत ठेवली. आम्ही लहान असताना पहाटे पिंगळा ज्योतीष घरोघरी भिक्षा मागण्यास यायचे. आजकाल ते बंद झालेत . त्यांच्या हातात लहान डमरु सारखं एक वाद्य असायचे ज्याचा आवाज पिंगळा पक्षाच्या आवाजा सारखा यायचा.ते काही गीतं गायचे. पण लहान असल्यानं त्या गाण्यापेक्षा त्यांच्या वेषभुषेचं आणि त्या वाद्याच कुतुहल असायचं. त्या मुळे त्यावेळी त्या गीतांकडं कधी लक्षच गेलं नाही. नंतर अस एेकल की या पिंगळा ज्योतीषांनी निळावंती हा ग्रंथ वाचला आहे व त्यांना पशु-पक्षांची भाषा ज्ञात असते. पण हे समजेपर्यंत ते ज्योतीष यायचे बंदही झाल होते, त्यामुळे खरं काय हे त्यांनाच माहीत. पण जसं कळायला लागलं तसं त्या ज्योतीषांचं येणंही बंद झालं आणि विचारायचेही राहुन गेलं. त्यानंतर खुप ठिकाणी हा ग्रंथ शोधण्याचा प्रयत्न केला पण हा ग्रंथ मिळालाच नाही.
फेसबुक वरती या ग्रंथाच्या नावाची पेजेस ही कुणी तरी बनवली आहेत तिथुनही काही जास्त माहीती भेटत नाही.तिथेही कुणी चित्तमपल्लींच पुस्तक दाखवतं तर कुणी नवरंग प्रकाशनचं. प्रत्येकाकडे फक्त प्राथमिक माहीतच उपलब्ध आहे. जालावरतीही काहीजणांनी याच्याविषयी लिहले आहे.( अधिक माहीती साठी गुगल करुन पहा). मागे एकदा दैनिक सकाळ मधे दर रविवारी प्रकाशित होणार्या सप्तरंग या पुरवणीत उत्तम कांबळे यांचा या विषयीचा एक लेखही आला होता.
  या ग्रंथाच्या काही प्रती अजुनही काही लोकांकडे आहेत अस सांगीतलं जातं. काहीजण आपल्याकडे त्याची हस्तलिखित असल्याचाही दावा करतात. पण ते देण्यास लोकांसमोर आणण्यास मात्र नकारच येतो. त्यामुळे याची सत्यता पडताळता येत नाही.
निळावंती ची कथा ही मौखिक असल्यामुळे पिढ्या दर पिढ्या ती चालत आली , ती खुलवुन सांगण्यामुळे त्या मधे काही नवीन गोष्टीही मिसळल्या गेल्या असतील, काही भाग वगळलाही असेल. पण गुढ वाढतच गेलं आणि कुतुहलही.
    या ग्रंथाविषयी देखिल खुप कमी माहीती उपलब्ध आहे.प्रत्येकाची आपली एक वेगळीच कथा. जितक्या व्यक्ती तितक्या कथा असचं म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच या ग्रंथा भोवती गुढतेचं वलय निर्माण झालं. आणि लोकांचं कुतुहलही वाढत गेलं.
     याच्या विषयी काही माहीती सांगीतली जाते ती अशी की, हा ग्रंथ एकांतात वाचावा लागतो. संस्कृत भाषेत असलेल्या या ग्रंथात प्रत्येक प्राणी-पक्षी व जीव यासाठी या ग्रंथात वेगळा मंत्र आहे. त्या मंत्राच्या उच्चारणा बरोबर तो तो प्राणी किंवा पक्षी त्या ठिकाणी उपस्थित राहतो.कांहीच्या मते यामधे राक्षस,भुत,पिशाच यांचे ही मंत्र आहेत.(पौरणिक ग्रंथांनुसार पशु-पक्षी ,मानव यांप्रमाणे राक्षस, भुत, पिशाच हे सुध्दा ८४लक्ष योनी मधे येतात. या ८४लक्ष योनींचा उल्लेख पौराणिक ग्रंथात येतो.) वाचना दरम्यान काही शक्ती वाचनात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. त्या वाचकाला काही इजा करत नाहीत, फक्त घाबरवतात, आणि काहीजण इथेच घाबरतात व वाचन अर्धवट सोडतात. आणि त्या शक्ती नियंत्रित न करता आल्यामुळे संभवत: वेड लागणे वगैरे गोष्टी घडतात.पण ही सर्व एेकिव माहीती आहे. कदाचित मुळ ग्रंथ अजुनही वेगळा असु शकतो.
जसं की सहदेव-भाडळी या ग्रंथात पशु-पक्षांच्या हालचालीवरुन, आवाजावरुन शुभाशुभ शकुणांची, ऋतुमानाची भाकीतं केली आहेत तसही काही असु शकतं.
पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरुपात आल्यामुळे त्याच्यात चमत्कारीक भाग मिसळला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्या प्रमाणे आपल्या काही शास्त्रांमधे अनेक वैज्ञानिक प्रयोगांची वर्णने आहेत. जसं की महर्षी भारद्वाज लिखित वैमानिक शास्त्र, यंत्रसर्वस्वम् हे ग्रंथ. फक्त ती भाषा व त्या भाषेतील त्या काळातील काही शब्दांमुळे म्हणा किंवा त्या गोष्टींचं विशेषणे वापरुन जे काही अलंकारीकरित्या चमत्कारीक वर्णन केलेल असतं त्यामुळे आपण ते समजु शकत नाही.( पुढील लिंक वरती अगस्त्य संहीतेतील अशाच एका प्रयोगाविषयी एक लेख वाचु शकता.Click Here ) परंतु चमत्कारांचा विषय आला की मग संपलच.इथे काही लोकांच ठरलेल वाक्य " अरे कुठल्या काळात जगतोयसं, २१ वे शतक चालु आहे, या सर्व भाकडकथा आहेत" आणि विषय तिथेचं संपतो. त्यांचीही यात काही चुक नसावी कारण मागील काळात अनेकांनी चमत्काराच्या नावाखालि जी काही कृत्य केली त्यामुळेही हे असु शकतं.
पण कसं आहे चमत्कारा कडे चमत्काराच्या नजरेनेच बघाव असंही काही नाही. कदाचित त्यातही काहीतरी वेगळा अर्थही असु शकतो. नाही पण आपल्याकडे तेवढा वेळचं कुठे असतो. मग कालांतराने कुणितरी काहीतरी शोध लावला की म्हणायचं की " अरे, आमच्या पौराणिक साहीत्यांमधे तर याचा उल्लेख अगोदरचं आहे." आणि नंतर वाद करण्यासाठी मात्र आपल्याकडे भरपुर वेळ.
परंतु जर आपल्यालाच आपले ज्ञान, साहीत्य, संस्कृती आत्मसात करता व जपता आली नाही तर त्यामधे त्या शोध लावणाराची काहीच चुकी नाही.
आपण आपल्या मुळ विषयाकडे वळु, तर एवढंच म्हणायचं की निळावंती मध्येही अस काहीतरी असु शकतं. पण त्यासाठी तो ग्रंथ तरी मिळायला हवा ना. खरेतर या ग्रंथाच्या अस्तित्वा विषयी देखिल शंका आहेच. पण जस वर सांगीतलं तस काही काही लोकांकडे हा ग्रंथ असल्याचेही दावे आहेत. आणि बहुतेकांनी याच्याविषयी एेकले आहे त्यामुळे अस्तित्व नाकारु ही शकतं नाही. काहींनी आपल्या पुर्वजांकडे किंवा नातेवाईकांकडे हा ग्रंथ होता पण त्यांनी तो कुठेतरी ठेवला किंवा जलार्पन केला असंही सांगतात. हा ग्रंथ प्रत्यक्ष पाहीलेला व वाचलेला मलातरी अजुन भेटला नाही. या ग्रंथाविषयी कितीही माहीती गोळा केली तरीही त्या ग्रंथापासुन आपण तेवढेच दुर असल्याचं जाणवते. मागे फेसबुक वरती एका पेजवरती कुणीतरी एक फोटो अपलोड केला होता, ज्यामधे एका तांब्याच्या पत्र्यावर निळावंती हे नाव कोरलं होत व त्या खाली ईसवी सन १६०९ आणि लेखक म्हणुन भास्कर भट्ट व त्यापुढे भाषा संस्कृत असं कोरलं होतं. पण दुसरा कुठलाही फोटो नव्हता. त्याने बाकी फोटो अपलोड केले नाहीत. त्यामळे तो खरचं निळावंती ग्रंथ होता का हे कळु शकलं नाही. या ग्रंथाविषयी चे बाकी लोकांचे तर्क-वितर्क जालावरती व सोशल साईट्स वरती भरपुर वाचायला मिळतील. 
    या पुस्तकाच्या गुढतेमुळ म्हणा किवा लोकांनी या विद्येच्या केलेल्या वापरामुळे म्हणा या ग्रंथाला काळी किनार लाभली. काहींनी याला काळ्या जादुचा ग्रंथ असंही म्हटलं आहे, अघोर साधनेचाही ग्रंथ म्हटलं.काही लोकांनी हा ग्रंथ मिळवण्यासाठी अघोरी प्रकार केलेही असतील. या ग्रंथाच्या नावावर अनेकांना लोकांना लुबाडलेही. गुप्तधनाच्या नावाखाली अमानुष कृत्येही केली.
पण त्यामुळे तो ग्रंथ ते शास्त्र किंवा ती विद्या वाईट ठरत नाही ना. कारण  प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतात एक चांगली दुसरी वाईट. आपण त्या गोष्टीचा कसा उपयोग करु त्यावर ते अवलंबुन असतं.  आता आजच्या काळातील उदाहरण घ्यायचं झालं तर अणु(Atom) चा शोध लागला. त्यामुळे विज्ञानात क्रांतीही झाली पण त्यातुनच अणुबाॅम्ब तयार केला. आज अणुचं नाव जरी निघालं तर प्रथम अणुबॉम्बच आठवतो ना. तसचं काहीस या ग्रंथाविषयी झालं असेल.याच्या विषयीच नाही तर प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत हेच घडतं आणि चांगल्या गोष्टीही बदनाम होतात.
अनेकांनी या ग्रंथाच्या शोधात आपलं आयुष्य खर्ची घातलं. मागे काही लोकांविषयी हा ग्रंथ वाचल्याच्या अफवाही होत्या. शेवटी कुणी किती खोल जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
हा ग्रंथ अस्तित्वात असेल का नाही  हे काळालाच ठाउक.  कारण निळावंती ची कथा खरी असेल आणि हा ग्रंथ जर अस्तित्वात असेल तर याचा एकमेव साक्षीदार काळचं आहे.कदाचित काळाच्या या चक्रात इतर अनेक अमुल्य साहीत्याप्रमाणे हेदेखिल हरवलं असण्याची शक्यता आहे.
परंतु जो पर्यंत माणसाच्या मनात कुतुहल आहे, नवीन गोष्टी जाणुन घेण्याची जिज्ञासा आहे आणि जो पर्यंत ही कथा जिवंत आहे, तोपर्यंत पिढ्यान् पिढ्या हा शोध असाच हा चालु राहणार. 
प्रदिप काळे (मुक्त कलंदर)
पंढरपुर 
९६६५९८०६०४
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे सुद्धा अवश्य वाचा सहदेव भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
__________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected