Showing posts with label मुक्त काव्य. Show all posts
Showing posts with label मुक्त काव्य. Show all posts

युग प्रवाहीणी


समोर दिसत असलेलं भग्न राऊळ पाहताना जाणवतंय,
या तुझ्या काठावर कधीकाळी वसलं असेल एखादं छोटंसं गाव
अथवा एखादा शांत, एकांत आश्रम...
विसावला असेल इथे, अविरत काळप्रवाहात प्रवास करणारा मानव समुह
वा या अनंत प्रवासातुन मुक्तिकडे निघालेला कुणी तपस्वी


तुझ्या या निळ्याशार अमृताने शिंपली असतील कुणी आपुली स्वप्ने
सुर्योदयाला वाहिली असतील तुझ्या थंडगार उदकाची अर्घ्ये
ऐकल्या असतील पहाटेच्या निरव शांततेत एखाद्या जनीच्या ओव्या, मंदिरातील वेदघोष
किंवा कातरवेळी कुण्या बैराग्याने छेडलेली भैरवी


स्मरणात असेल तुझ्या आजही एखाद्या राधेसाठी 
कुण्या श्रीहरीने तुझ्याच काठावर बसून वाजवलेली अलगुज
तुझ्या निळ्याशार पाण्यातुन आपल्या सख्यासोबत नौका विहार करताना 
लाजेने चूर झालेला नवयौवनेचा साज


पाहिली आहेत तु या काळाची अगणीत स्थित्यंतरे
बदलणारा समाज आणि बदलणारी मने
आपल्या पापांचा भार तुझ्या माथी मारून नव्याने उभे ठाकलेले चेहरे


कधीतरी असह्य होऊन धारण केलेल्या तुझ्या रौद्र रुपाला पाहुन 
तुलाच दोष देत पांगली असेल इथली वसाहत
वा मिळाली असेल त्या तपस्व्याला त्याची सायुज्यता
आणि पुन्हा झालीस तु एकाकी पण तरीही तशीच स्थितप्रज्ञ, शांत...


आता मी बसुन आहे इथेच तुझ्या काठावर, तुझ्याकडेच पाहत
तुझ्यासारखाच संथ, शांत आणि एकाकी...
शोधत आलोय तुझ्या जुन्या खुणा,
शोधयचाय तुझ्या अमृतरुपी प्रवाहाने आजही भुल पडलेला एखादा राजहंस
पहायचंय एखाद्या डोहात शिल्लक असलेलं तुझं स्फटीकरुपी अस्तित्व
भरून घ्यायचाय पाण्याबरोबर वाहणारा तुझा अवीट गंध
ऐकायचा आहे वाळूच्या कणात साठलेला, समोरच्या भग्न राऊळातील घंटानाद
आणि अनुभवाचायं जनीच्या गोवर्यांगत, तुझ्या थेंबाथेंबातून मुरलेला, तो पहाटेचा वेदघोष 
ऐकवशील ना......


-मुक्त कलंदर (प्रदिप काळे ) 
__________________________________________________________

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

आज तु आठवलीस...


आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले
कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले.

खंत यासाठी की,
मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी
गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी
भीती नव्हती बोलण्याची,
हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची
भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही

अन् आनंदाचे यासाठी की,
आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस
अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस
ताल बिघडले मनाचे,
हो तालचं बिघडले मनाचे
कारण तु सुरचं घेऊन गेलीस

आता आजही शोधत असतो फक्त तुला,
कधी मोगर्याच्या गंधात
कधी फुलांच्या पाकळ्यात
कधी सागराच्या लाटेत
कधी चंद्राच्या चांदण्यात
तर कधी तार्यांच्या अंगणात

अन तु भेटतेसही मला
कधी एकांताच्या कोन्यात
कधी विरहाच्या तळात
कधी मौनाच्या शब्दात
कधी सुरांच्या मैफलीत
तर कधी या कवितेच्या पानात.

आज फक्त तुला आठवतो
कारण वेळ माझी केव्हाच गेली
पण वाट पाहतो तुझी आजही
कारण तुझी वेळ अजुन नाही गेली

कधीतरी तुला कळेलही
सुर माझा गवसेलही
शब्द माझा एेकशीलही
मागे वळुन पाहशील ही

मी उभा असेन तिथेच
जिथे तुला पाहीले
अन् शब्द माझ्या कवितेतील
जिथे पुर्वी हरवले

मी असेन तिथेच
वाट पाहत फक्त तुझी.

-मुक्त कलंदर (प्रदिप काळे).
_____________________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected