सुचेल ते... सुचेल तसे...
काही माझ्या मनातलं ... काही आठवणीतलं ...
काही सुचलेलं ... तर काही आवडलेलं ...
काही स्वत: विषयी.. तर काही या अनंत सृष्टीविषयी...
काही कविता..तर काही लेख...
पण जे काही असतील ते मुक्त विचार मला सुचलेले...
या कलंदराच्या नगरीत आपले सहर्ष स्वागत!!!
" इये कलंदराचिये नगरी । साहित्य फळे गोमटी ॥
जो रसिक चाखी निगुती। तोची जाणे॥ "
- प्रदिप काळे
आठवडा भराची रजा टाकून गावाकडं आलं की पहिले काही दिवस खुप मजेत जातात,
परंतू जस-जसं परत निघायची वेळ जवळ येते तस-तसं मनात एक वेगळीच भावना तयार होते, की जी शब्दातून व्यक्त करताच येत नाही. ती फक्त जाणवत राहते आतून...
मग असं एकटं बसलं की आठवायला लागतात
त्या ठिकाणी आपण व्यतीत केलेले क्षण...
मनाच्या खोल तळाशी हळूहळू एकेक प्रसंग उभारुन येऊ लागतात....
उगाच कुणाशीही न बोलता शांत पडून रहावं वाटतं... शून्यात बघणं काय असतं ते याक्षणी जाणवतं.
वरुन स्थिर वाटणाऱ्या मनाचा तळ मात्र असंख्य आठवणींनी ढवळून निघालेला असतो. ज्याच्या पुसट छटा वरती जाणवल्याशिवाय राहत नाहीतंच, मग आपली इच्छा नसूनही घरी सगळ्यांच्या नजरेत ते आल्याशिवाय राहत नाही, आणि मग ते विचारतातच,
" असा का बसला आहेस? कुणाशी बोलत नाहीस की काही नाही? काय झालंय? "
पण काय सांगणार , जे स्वतःलाच कळत नाही ते त्यांना तरी कसं सांगायचं.
खरंतर त्यांनाही कळलेलं असतंच, पण आपल्याला अजून त्रास होईल म्हणून ते फक्त कुणी तसं बोलून दाखवंत नाही. कारण त्यांनाही ठाऊक असतं की दुसरा पर्याय नाही.
पण एक मात्र खरं घरुन पाय काही निघंत नाही, आणि तिथून निघाल्याशिवाय पर्यायच नसतो.
नोकरी करणारांच्या (किंवा चाकरमान्यांच्या) आयुष्यातल हे अटळ सत्य की आपलं घर, आपला गाव ,आपली माणसं, आपली माती काही केल्या सुटत नाही, पण याच घरासाठी ते सोडून तिथून दूर रहावं लागतं...
पण एक मात्र खरं की, जाताना आपण एक नवी उर्जा, नवी उमेद घेऊन निघतो की जी पुन्हा परत येईपर्यंत टिकून राहते. आणि सोबत असतं नवीन आठवणींच गाठोडं जे क्षणोक्षणी इथली आठवण देत राहतं.... आणि पुन्हा परतण्याची आशा जागवत ठेवतं...
चित्रकला हा आवडता विषय, शालेय अभ्यासक्रमात पाचवी ते आठवी हा विषय शिकवला जायच. परंतु तेव्हा जो काही तेवढा अर्धा- एक तास काय तोच या विषयाशी संबंध यायचा. सुदैवाने या विषयाला शिक्षक खुप चांगले मिळाले त्यामुळे ही आवड टिकुन राहीली. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदविका व पदवी मध्ये ड्रॉइंग हा विषय पुन्हा आला, पण तिथे फक्त २d plans व Isometric Drawing तेही फक्त विषयाशी संबंधित एखादी इमारत व त्यासंबंधीत काही ऑब्जेक्ट्स. तेही आवडायंच म्हणा पण नंतर नंतर ते सर्व Auto CAD सॉफ्टवेअर च्या माध्यमातूनच होऊ लागलं.
पण मला आवांतर रेखाटनाचा छंद , मग काय कधी रिकामा असलो की असं काहीतरी रेखाटण्याचा मुड होतो. जरी इतकं अचुक जमत नसंल तरी रेखाटणाचा मोह आवरत नाही, माझ्यासाठी माझा हा छंद म्हणजे स्ट्रेसबस्टर आहे. तर त्यापैकीच मागील काही वर्षांतील जरासे जमलेले, जरासे फसलेले प्रयत्न पुढे देत आहे.