"महाराजांची... शिवाजी महाराजांची किर्ती बेफाम होती..."

 
सध्या कामानिमित्त तेलंगना मधील पालमुरु विद्यापीठात (Palamuru University) आहे. या भागातील बहुतांश रहिवासी लोकांना तेलुगू शिवाय अन्य भाषा येत नाहीत. काहींना मोडकी तोडकी हिंदी येते आणि त्यातंच संवाद चालवावा लागतो. तर इथं आल्यापासून कामशिवाय इतर बोलणं जास्त करून कुणाशी होतही नाही. आपल्या राहत्या शहरापासून दूर आणि त्यातही महाराष्ट्र पासून दूर. त्यामुळं मराठीतून बोलणं हे फक्त फोनवरंच घरच्यांशी आणि मित्रांशी. जे सोबत काम करणारे कलीग्स आहेत तेही इकडचेच तेलंगणा किंवा आंध्रप्रदेश. तर त्यांच्याशी संवादही एकतर हिंदी किंवा इंग्रजी. तर सांगण्याचा हेतू एकचं की राहणं-खाणं, भाषा , वातावरण सगळंच एकदम बदलंल आहे.

तर मूळ विषयाकडे येऊ, हे विद्यापीठ आणि महबुबनगर हे जिल्ह्याचं ठिकाण यांच्यामधे "बंदामीडापल्ली"(Bandameedapalli) नावाचं एक छोटंसं गाव आहे. हैदराबाद- रायचूर मार्गावरचं हे गाव. हा मार्ग आणि त्याला जोडणारा गावात जाण्यासाठी रस्ता यांचा मिळुन एक तिठा तयार झाला आहे. या तिठ्यावर हा चित्रात दिसतो तो पुतळा आहे. किमान एका मराठी माणसाला तरी अगदी पहिल्या नजरेत ओळखु येणाऱ्या प्रसंगाचा हा पुतळा. 



तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवरायांना "भवानी तलवार" देतानाच्या प्रसंगाचा हा पुतळा. खरं सांगतो हा पुतळा दिसला आणि परदेशात कुणीतरी आपल्या घरचं माणुस भेटल्यासारखा आनंद झाला. त्यातही एक मराठी असल्याचा अभिमान आणि गर्वमिश्रीत आनंद झाला.

नंतर सहकार्यांकडून माहीती घेतल्यावर समजलं की दक्षिणेत शिवरायांना मानणार एक खुप मोठा वर्ग आहे. इथल्या बहुतांश गावात चौकातुन महाराजांचे पुतळे आहेत. शिवजयंती वेळी महाराजांची खुप मोठी रथयात्रा निघते. नंतर "गुगल"बाबा ला विचारलं असता त्यांनी ही👈 लिंक दिली. चलचित्राची भाषा तेलुगू असली तरी काही शब्द कळुन येतात.(कॅप्शन ऑन केल्यास अजुन समजण्यास मदत होईल. महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहीमेचा( श्रीशैलम् , गोवळकोंडा इ.) इतिहास तर सर्वांना माहीत आहे. या दिग्विजयाची ही खुणंच म्हणता येईल. 

माझं राहण्याचं ठिकाण याच बंदामीडापल्ली गावातंच आहे, रोज जाण्या-येण्याच्या वाटेवर हा पुतळा लागतो आणि रोज गर्वाने उर भरुन येतो, मन आनंदाने फुलून जातं आणि मस्तक आपोआपच नमस्कारासाठी झुकतं आणि मनात एकंच वाक्य घुमतं "महाराजांची... शिवाजी महाराजांची किर्ती बेफाम होती..."


फावल्या वेळातील छंद- पेन व पेन्सिल रेखाटणे...

चित्रकला हा आवडता विषय, शालेय अभ्यासक्रमात पाचवी ते आठवी हा विषय शिकवला जायच. परंतु तेव्हा जो काही तेवढा अर्धा- एक तास काय तोच या विषयाशी संबंध यायचा. सुदैवाने या विषयाला शिक्षक खुप चांगले मिळाले त्यामुळे ही आवड टिकुन राहीली. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदविका व पदवी मध्ये ड्रॉइंग हा विषय पुन्हा आला, पण तिथे फक्त २d plans व Isometric Drawing तेही फक्त विषयाशी संबंधित एखादी इमारत व त्यासंबंधीत काही ऑब्जेक्ट्स. तेही आवडायंच म्हणा पण नंतर नंतर ते सर्व Auto CAD सॉफ्टवेअर च्या माध्यमातूनच होऊ लागलं.
 पण मला आवांतर रेखाटनाचा छंद , मग काय कधी रिकामा असलो की असं काहीतरी रेखाटण्याचा मुड होतो. जरी इतकं अचुक जमत नसंल तरी रेखाटणाचा मोह आवरत नाही, माझ्यासाठी माझा हा छंद म्हणजे स्ट्रेसबस्टर आहे. तर त्यापैकीच मागील काही वर्षांतील  जरासे जमलेले, जरासे फसलेले प्रयत्न पुढे देत आहे.

रेखाटण १ आणि २- तळजाई मॅन्शन, तळजाई टेकडी, पुणे.
मुळ छायाचित्र- माझ्या फोनच्या कॅमेरातून
१.
२.
---------------
चित्र ३,४,५ व ६ब्लू पेन व पेन्सिल रेखाटण - 
मुळ चित्र कल्पना आणि स्त्रोत- google images
३.
४.
५.
६.
धन्यवाद
- प्रदिप काळे ( मुक्त कलंदर )

अनाकलनीय

             

                   सुरूवात कुठून करावी कळत नाहीये. परंतु हे सगळं जे माझ्या बाबतीत घडतयं याची नोंद हवी. त्यापेक्षाही महत्वाचं हे कुणाला तरी सांगायला हवं, पण ऐकल्यानंतर समोरच्याने समजून घेण्यापेक्षा वेड्यात काढण्याचीच शक्यता जास्त. म्हणून हे लिहुन ठेवायचं ठरवलं आहे. पण खरंच नक्की सांगायचं कुठुन; कारण याची सुरुवात कधी झाली ते माहीत नाही. की...? माझ्या बाबतीत असं घडतंय हे मला समजलं तेव्हापासून सांगु? खरंतर तुमचा विश्वास बसणार नाही, माझाच बसला नव्हता.पण शेवटी हे सगळं माझ्याच सोबत घडतंय, आणि पुन्हापुन्हा घडतंय. सुरवातीला वाटलं, असेल काही योगायोग पण नाही;  वारंवार घडतंय त्याला योगायोग कसं म्हणायचं.आता हे कसं सांगायचं तेदेखील मला कळत नाहीये. कुणाविषयी चांगलं बोलायची सोयच राहिली नाही हो! पण कुणालातरी हे सांगायलाच हवं त्याशिवाय मला शांती लाभणार नाही. पुन्हा तरी लाभेल की नाही कुणास ठाऊक? पण सांगायला हवं. मी परतपरत तेच बरळतोय. काहीच कळत नाहीये मला.काय होतो मी आणि काय झालोय मी ? माझं सारं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. सारं काही सुखात, आनंदात चाललं होतं. कुणालाही हेवा वाटेल असं आयुष्य होतं. पण हे असं  भयानक वळण मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. नाही! आता सांगायला सुरुवात केलीच आहे तर अगदी पहिल्यापासून सांगतो, उगाच मधुन कुठेतरी शिरायला नको.

               तर माझं नाव.....  नको तसंही जे घडतयं त्याचा नावाशी काहीच संबंध नाही,  आणि असला तरी त्याने काय फरक पडतो म्हणा. माझा जन्म इथलाच. माझे वडील, आजोबा, पणजोबा सगळे इथंच जन्मले आणि इथल्याच मातीत मिसळून गेले.पण हे आमचं मुळ गाव नसलं तरी आता तेच आहे. वडिल सांगायचे, खुप पुर्वी आमचा कुणीतरी पुर्वज इथं आला आणि त्यानं हा गाव वसवला. त्याला आता कैक पिढ्या उलटल्या. असो याचाही काही संबंध नाही. 

            घरची परिस्थिती उत्तम होती. कशाचीही ददात नाही. वडिल प्राध्यापक, घरची वडिलोपार्जित बागायती जमीन, रहायला चांगलं दोन मजली पक्क घर. कशाचीही कमतरता नाही.   अजुन काय हव आयुष्यात. कुणालाही हेवा वाटेल. माझं प्राथमिक शिक्षण याच शहरात झालं. पुढील शिक्षण एका नामांकित महाविद्यालयात झालं. सगळे छंद जोपासले. लिहायची आवडं, तसंच वक्तृत्व ही चांगलं आहे. पदवी मिळाली. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतलं. वडील शिक्षक, मलाही तेच आवडायच म्हणून मीही एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो.९-५ ची घराजवळची नोकरी, दिनदर्शिकेत लाल रंगाची तारीख आली कि हमखास सुट्टी. मग कुठेतरी फिरायला जायचं. 

           पुढे लग्न झालं. आपल्याला लहानपणापासून आवडणारी मुलगी पत्नी म्हणून मिळनं यासारखं दुसरं भाग्य नाही. पुढे काही वर्षात एक मुलगा, एक मुलगी. सारं अगदी आधिच ठरवल्यासारखं सहज आणि विनासायास. कधी कुणासमोर हात पसरायची वेळ आली नाही की कुणाशी कधी वाद नाही. म्हणजे आयुष्य सरळ आणि आनंदात चाललेलं असताना कुठे माशी शिंकली काय माहीत?

            हे माझ्यासोबत घडतंय याची जाणिव मला साधारण काही महिन्यांपूर्वीच झाली. याआधी असं काही घडलं असेल तर ते आठवत नाही. तर झालं असं माझा मुलगा. मी इथं कुणाच्याही नावाचा उल्लेख करणार नाही, बदलुन सुद्धा. तर तो  त्यावेळी आठवीत होता. लहानपणापासून हुशार. कायम टॉप रॅंकमधे. आणि मुलगी असेल सहावीला. तीला गायनाची आवड. माझे मित्रमंडळी, पाहुणे यांच्याकडे मी कायम माझ्या मुलांची स्तुती करायचो.  माझी मुलं अशी, माझी मुलं तशी. त्यांना हे आवडतं- ते आवडत नाही वगैरे वगैरे. एकुण काय तर  आपल्याच पोरांची स्तुती करायला आपल्याला कुणाच्या बापाची भीती, नाही का?

               खुपचं अघळपघळ होतंय ना? पण काय करणार सांगायचं ठरवलंच आहे तर..

               तर कुठं होतो आपणं...अं...?  हं... काही महिन्यांखालचीच गोष्ट. आमच्या हीचे कुणीतरी नातेवाईक नुकतेचं या शहरात रहायला आले होते.आणि त्यादिवशी आम्ही त्यांना जेवणाकरता बोलायला होतं. तर चहापाणी झालं आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो त्यांची मुलं आणि माझी मुलं खेळत होती सहज विषय मुलांच्या शिक्षणावर आला आणि मी जी माझ्या मुलांची स्तुती चालू केली. कदाचित त्या पाहुण्यांना सुद्धा विचित्र वाटलं असेल पण आपल्याला कुणाच्या बापाची भीती नाही का? हे झालं आणि त्याच्यानंतर काहीच दिवसानंतरची गोष्ट असेल खूपच वाईट घटना घडली माझी मुलगी जी गायन शिकत होती तिचा अचानक घसा बसला. तुम्ही म्हणाल घसा बसणं ही काय तितकी वाईट गोष्ट नाही आज ना उद्या चांगला होईलच की. उपचार सुरू होते, फरक पडेना, नंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून काही टेस्ट केल्या आणि रिपोर्ट आला की तिला थ्रोट इन्फेक्शन झालं आहे आणि कदाचित त्यामुळे तिच्या आवाजात बदल पडू शकतो, त्यामुळे भविष्यात याचा परिणाम तिच्या गायनावर पडू शकतो. हा धक्का बसतो न बसतो तोच काही दिवसात आमच्या चिरंजीवांकडून कडून एक धक्का बसला. महिन्याभरापूर्वीच सहामाही परीक्षा झाल्या होत्या आणि त्याचा रिझल्ट आला तर आमच्या चिरंजीवांची एका विषयात विकेट उडाली होती आणि कहर असा की जो विषय मी शिकवत होतो म्हणजे इतिहास त्यात चक्क तो काठावरती पास झाला होता. पण मी विचार केला की, डोक्यात जरा हुशारपणाची हवा वगैरे शिरली असेल आणि त्यात ती सहामाही होती आणि तिही आठवीची म्हणून जास्त काही बोललो नाही.

             पण नंतर एक अशीच घटना घडली. मी नववीच्या वर्गाला इतिहास शिकवायचो माझ्या क्लास मधला एक हूशार विद्यार्थी अभ्यासात हुशार तसाच इतर ऍक्टिव्हिटी मध्येही. तर सहामाही नंतर पालक मिटींग होती. सहामाहीला त्याचा रिझल्ट खूप चांगला आला होता म्हणून त्याच्या पालकांसमोर त्या मीटिंगमध्ये त्याची खूप स्तुती केली. मग काय पालकही खुश. पण सहामाही नंतर येणाऱ्या घटक चाचणी परीक्षेत तो चक्क नापास होता होता राहिला आणि विचार करण्याची गोष्ट म्हणजे माझ्या क्लास मधला दुसरा विद्यार्थी जो आज पर्यंत काठावर पास व्हायचा सहामाहीला त्याचे दोन विषय राहिले आणि त्याच्या वडिलांसमोर मी त्याची खरडपट्टी काढली तो चक्क चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. माझा विश्वास बसत नव्हता पण शेवटी त्यातला माझ्या विषयाचा पेपर मी स्वतः तपासला होता आणि तिथे तीच परिस्थिती होती. या साऱ्या घटनांत वेळेचं अंतर असल्याने त्या वेळी मला जास्त काही जाणवलं नाही आणि जास्त विचारही केला नाही. पण यानंतर मात्र एका पेक्षा एक विलक्षण घटना घडू लागल्या आणि हे इतरांना जरी जाणवलं नाही तरी मला आता हळूहळू जाणवू लागला होतं.कुणाचं कौतुक करायला जावं तर त्याच्या उलटच घडु लागलं. कुणाच्या सुंदरतेची स्तुती करावी तर काही कारणाने त्यांच्यात बदल. स्लिम ॲंड ट्रीम फिगरसाठी बायकोची तारीफ करावी तर पुढील काही महिन्यात तिची फिगर बिघडली. कधीच कुणासोबत असं घडलं नसेल ईतकं विचित्र घडत होतं. 

               एकदा माझा एक शिक्षकमित्र, त्याचा वाढदिवस होता. तो माझा अत्यंत जवळचा मित्र. तुझा कुणी बेस्ट फ्रेंड आहे का? असं जर मला कुणी विचारलं तर मी याचंच नाव घेईन. अगदी शांत, तल्लख , सर्वात मिसळणारा, प्रत्येकाशीच खुल्या मनाने वागणारा, अजातशत्रू असा हा माझा मित्र. तर त्यादिवशी त्याने एक छोटी पार्टी आयोजित केली होती. आम्हा सर्वांनाच कुटुंबासह आमंत्रण होतं. केक कापायच्या आधी प्रत्येकजण त्याच्याविषयी स्तुतीपर दोन शब्द बोलु लागले. माझी बारी आली, तो माझा जवळचा मित्र; मग काय एक लांबलचक भाषणंच ठोकलं. पार्टी झाली. त्यानंतर काही दिवसांनी एक गोष्ट जाणवली हा माझा मित्र जरा विचित्र वागु लागला. तो माझ्याशीच नव्हे तर प्रत्येकाशीच तुटक वागु लागला. माझी तर तो भेटही घेत नव्हता. मी माझ्या पत्नीला सांगुन तिला त्याच्या पत्नीला कॉल करुन विचारायला लावलं तर घरीही तिच परिस्थिती. कुणाशी निट बोलणं नाही, थोड्या थोड्या गोष्टींवरुन त्रागा करत होता. मी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला लावली. पण पुढच्या दोन दिवसातच तो कुणालाही न सांगता सारं गुंडाळून गावी निघून गेला. हे सर्व फक्त पंधरा दिवसात घडलं. पुन्हा तर त्याने माझा फोनसुध्दा उचलला नाही. त्याच्या पत्नीने तिच्या शेजारी सांगुन ठेवल्याने हे समजलं.

              या घटनेनंतर माझ्या मनात या काही महीन्यात घडलेल्या गोष्टींची आपोआप उजळणी होऊ लागली. मला तरीही खात्री वाटत नव्हती. परंतु हे सर्व योगायोगाने तर घडणारं नव्हतं. आणि या सगळ्यात एकच कॉमन गोष्ट होती ती म्हणजे मी. पण आता बराच उशीर झाला होता. खुप साऱ्या अघटीत घटना घडल्या होत्या आणि याला जबाबदार कोण तर फक्त मी. आता हे कुणाला सांगावं तर त्याने विश्वास ठेवण्याऐवजी मलाच वेड्यात जमा केलं असतं. नाहीतर साऱ्या गोष्टींचं खापर माझ्या माथी मारत गावभर बोभाटा केला असता.काय करावं काहीच कळत नव्हतं.हा सगळा मनाचा खेळ म्हणावं तर वेळोवेळी प्रत्यय येत होता. आणि हे फक्त माणसांच्या किंवा सजीवांच्या बाबतीतच होत होतं असं नाही, तर निर्जीव वस्तूंबाबत पण तेच. 

               त्यादिवशी आमच्या शेजारचे काका, त्यांनी नवीन चारचाकी खरेदी केली. माझ्या मागेच लागले की तु एकदा चालवून बघ आणि कशी वाटते ते सांग. शेवटी नाईलाजाने मी त्यांना सोबत घेऊन एक चक्कर मारली. त्यांना म्हणल काका छान आहे गाडी, कंफर्टेबल, इंजिन क्षमता वगैरे. आता त्यांना कौतुक ऐकायचं होतं आणि गाडीही चांगली होती म्हणून केलं कौतुक. दुसऱ्याच दिवशी गाडीला पार्क केलेल्या जागेवरच कुणीतरी त्याची गाडी वळवताना ठोकली आणि तीही पुढल्या बाजुने. झालं निघालं इंजिनकाम. भले त्यांचा विमा होता आणि याला प्रत्यक्ष मी जबाबदार नसलो तरी जे होतं ते मलाच माहीत होतं. 

               शेवटी ठरवलं कि आजपासून कुणाचीही स्तुती करायचीच नाही. आपल्यामुळं कुणाचं वाईटही नको आणि नुकसानही नको. पण आता तुम्हीच सांगा एखादी कौतुकास्पद गोष्ट पाहीली की आपल्या तोंडून आपल्याही नकळत कौतुकाचे शब्द बाहेर पडतातचं पडतात. ते आपणही रोखु शकत नाही.आणि काही वेळा समोरच्यालाही आपल्याकडुन त्याची अपेक्षा असते.

                एकदा शाळेत साहित्य सप्ताह होता. त्यानिमित्त माझ्या एका कवीमित्रालाच आमंत्रित केलं होतं. तो पुर्वीचा माझा वर्गमित्र होता. खुप दिवसांनी आमची त्यादिवशी भेट झाली होती. कार्यक्रम एकदम मस्त झाला. मलाही कवितांची आवड आहे. कार्यक्रम झाला आणि आम्ही सर्वजण स्टाफरुम मधे एकत्र बसून कार्यक्रमाची चर्चा करत होतो. त्यात तोही होताच. सगळ्यांनी त्याची स्तुती केली केली. त्यात तो माझा मित्र होता मग मलाही थोडं मांस चढलं होतं, आणि सगळ्यांबरोबरच मीही त्याच्या कवितांची स्तुती केली. त्यानंतर महिना-दीड महीनाच झाला असेल. त्याची आणि माझी रस्त्यात गाठ पडली. हाय-हेल्लो झालं, मग तिथंच एका हॉटेलमध्ये चहासाठी गेलो. गप्पा सुरू झाल्या. इकडचं-तिकडच झाल्यावर विषय कवितांवर आला. मी सहजच म्हंटलं,

" काय मग कवी महाराज काही नवीन असलं तर ऐकवा की!"

तसा त्याचा चेहरा पडला, पण पुढच्याच क्षणी उसणं  हसु आणत म्हणाला,

"काय नाही यार, आता महीण्याच्या वर झालं पण नवीन अक्षरही लिहिलं नाही की सुचलं नाही. पुर्वी रोज नसलं तरी दोन-तीन दिवसाला काहीना काही सुचवायचं, पण आता पेन घेऊन बसलं की उगाच कागदावर रेघोट्या मारत बसतो. सुचतंच नाही काही."

तसा मी मनात चरकलो.

“अरे त्यात काय सुचेल की , ते काय म्हणतात ते क्रिएटिव्ह ब्लॉक का काय असतो तसं असेल काहीतरी, तु उगाच ताण घेऊ नकोस.”

                तो फक्त हसला मीही विषय आवरता घेत काढता पाय घेतला. मी खरंतर बाजारात जात होतो पण तसाच काही न घेता मोकळा तडक घरी गेलो. आता कशातच लक्ष लागत नव्हतं. 

                बरं हे होतं तोवरही ठीक होतं, कारण काही असलं तरी कुणाच इतकंही मोठं नुकसान नव्हतं झालं. माझी मुलगी ती गाऊ शकत नसली तरी बोलु तरी शकत होती. थोड्याफार औषधोपचाराने ती अजुन सुधारेल ही. माझा मुलगा आणि माझ्या वर्गातील तो विद्यार्थी दोघांची गाडीही पुन्हा रुळावर येत होती.  थोडे कष्ट पडतील पण सुधारतील. कवी मित्राचंही असंच आता नाही सुचत पण सुचणारच नाही असं काही नाही ना? तसही त्याच्या नावावर बर्यापैकी साहित्य होतं. हा… पण एखाद्या कलाकाराची कलाच त्यांच्यापासून दुर होण, यासारखं मोठ दुःख नाही. पण आता वेळ निघून गेली होती. आणि माझा जिवलग मित्र तो माझ्यापासून दुर गेला. पण त्याचं आयुष्य मात्र पार उध्वस्त झालं या दोघांचच खुप वाईट वाटतं. मनाला कितीही समजावलं की या घटनांना दुसरी काहीतरी कारणे असतील पण कितीही समजुत घातली तरी जे दिसत होतं ते सत्य नाकारता येत नाही ना?

              याबाबतीत मानसोपचारतज्ज्ञाची भेटही घेतली. आठवड्यातली प्रत्येक शनिवारची संध्याकाळ तिथंच जात होती. पण प्रत्येक भेटीला गोळ्यांच्या डोसशिवाय काही हाती येत नव्हतं. बरं हे घरीही सांगता येत नव्हतं. गोळ्यांविषयी रोज विचारणा होत होती. ताण वाढत होता. लोकांबरोबर बोलायचीही भीती वाटु लागलीय आता. कारण आज या गोष्टीचा कहरच झालाय. मी पुरता हादरुन गेलोय. आता काय करावं काहीच सुचत नाहीये. आजवर कुणाचं ईतकं मोठ नुकसान झालं नव्हतं. पण आज याची हद्द झालीय. 

              कालच शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता, आणि मी नको म्हणत असतानाही कार्यक्रमाच्या प्रस्तावनेची जबाबदारी माझ्यावर आली. नको म्हणायला मला ठोस कारणही देता येईना. आता पाहुण्यांची ओळख करुन द्यायची म्हटल्यावर भली मोठी स्तुती करणं आलंच. मी घाबरलोच होतो. कार्यक्रमाचे पाहुणे हे मागच्या दोन महीन्याखालीच निवडून आलेले नगराध्यक्ष होते. मी शेवटी विचार केला की असो एवढं काय मोठं नुकसान होणार आहे, फारफार तर पुढच्या वेळी निवडून येणार नाही. किंवा असंच काहीतरी. काय मोठा फरक पडणार आहे. असा विचार करून मी अशी प्रस्तावना तयार केली की जास्त स्तुतीही वाटु नये आणि पाहुणेही खुष व्हावेत. शेवटी कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने निवांत जाऊन झोपलो. 

               आज सकाळी जरा उशीराच उठलो. अंघोळ वगैरे उरकली. आणि चहा पितपित मोबाईल चेक करू लागलो, तर एका मित्राचे १०-१२ मिसकॉल.  मग त्याला फोन लावला.

"अरे किती कॉल करायचे तुला?" तिकडून तो बोलला.

"अरे आताच उठलोय बोल न, काय झालं? 

आणि त्यानं जे सांगीतलं ते ऐकुण माझ्या पायाखालची जमीनच सरकली. " 

"अरे काल जे नगराध्यक्ष आले होते ना आपल्या कार्यक्रमाला ते पहाटे वारले ,  मी तिकडेच चाललोय अंत्यसंस्कारासाठी. बर ठेवतो गाडी चालवतोय."

               असं म्हणुन त्यानं फोन ठेवला, पण कितीतरी वेळ मी तसाच मोबाईल कानाशी धरुन होतो. माझं डोक सुन्नं झालंय. आणि जे घडलं होतं भयंकर होतं. नोटीफिकेशन टोनने मी भानावर आलो. मी मेसेज उघडला.

" शहरातील युवा नेतृत्व व नगराध्यक्ष श्री. XXXXX यांचा आज पहाटे अज्ञात कारणाने मृत्यू ..."

……….....................................................

कथेतील पात्र, प्रसंग पुर्णपणे काल्पनिक आहेत.

...................................

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील लेखनाचे सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

@ मुक्त कलंदर

______________________________________________

प्रतिमा स्त्रोत : पिक्साबे.कॉम


 

 

युग प्रवाहीणी


समोर दिसत असलेलं भग्न राऊळ पाहताना जाणवतंय,
या तुझ्या काठावर कधीकाळी वसलं असेल एखादं छोटंसं गाव
अथवा एखादा शांत, एकांत आश्रम...
विसावला असेल इथे, अविरत काळप्रवाहात प्रवास करणारा मानव समुह
वा या अनंत प्रवासातुन मुक्तिकडे निघालेला कुणी तपस्वी


तुझ्या या निळ्याशार अमृताने शिंपली असतील कुणी आपुली स्वप्ने
सुर्योदयाला वाहिली असतील तुझ्या थंडगार उदकाची अर्घ्ये
ऐकल्या असतील पहाटेच्या निरव शांततेत एखाद्या जनीच्या ओव्या, मंदिरातील वेदघोष
किंवा कातरवेळी कुण्या बैराग्याने छेडलेली भैरवी


स्मरणात असेल तुझ्या आजही एखाद्या राधेसाठी 
कुण्या श्रीहरीने तुझ्याच काठावर बसून वाजवलेली अलगुज
तुझ्या निळ्याशार पाण्यातुन आपल्या सख्यासोबत नौका विहार करताना 
लाजेने चूर झालेला नवयौवनेचा साज


पाहिली आहेत तु या काळाची अगणीत स्थित्यंतरे
बदलणारा समाज आणि बदलणारी मने
आपल्या पापांचा भार तुझ्या माथी मारून नव्याने उभे ठाकलेले चेहरे


कधीतरी असह्य होऊन धारण केलेल्या तुझ्या रौद्र रुपाला पाहुन 
तुलाच दोष देत पांगली असेल इथली वसाहत
वा मिळाली असेल त्या तपस्व्याला त्याची सायुज्यता
आणि पुन्हा झालीस तु एकाकी पण तरीही तशीच स्थितप्रज्ञ, शांत...


आता मी बसुन आहे इथेच तुझ्या काठावर, तुझ्याकडेच पाहत
तुझ्यासारखाच संथ, शांत आणि एकाकी...
शोधत आलोय तुझ्या जुन्या खुणा,
शोधयचाय तुझ्या अमृतरुपी प्रवाहाने आजही भुल पडलेला एखादा राजहंस
पहायचंय एखाद्या डोहात शिल्लक असलेलं तुझं स्फटीकरुपी अस्तित्व
भरून घ्यायचाय पाण्याबरोबर वाहणारा तुझा अवीट गंध
ऐकायचा आहे वाळूच्या कणात साठलेला, समोरच्या भग्न राऊळातील घंटानाद
आणि अनुभवाचायं जनीच्या गोवर्यांगत, तुझ्या थेंबाथेंबातून मुरलेला, तो पहाटेचा वेदघोष 
ऐकवशील ना......


-मुक्त कलंदर (प्रदिप काळे ) 
__________________________________________________________

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

(डिस्क्लेमर : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्यामुळे अंधश्रध्दा वगैरे मुद्यावर वाद घालु नये. या लेखाद्वारे फक्त समाजामध्ये चर्चिल्या जाणार्या काही गुढ व रहस्यमयी विषयासंबंधी लिहले  त्या विषयांमध्ये कुणी किती खोल जायचे व कुणी किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.  अंधश्रध्दा वगैरे विषयांवर वादविवाद करणार्यांनी स्वत:च्या जबाबदारीवरती हा लेख वाचणे.)
                         कुतुहल, मनुष्याला लाभलेल्या अमुल्य देणग्यां मधिल एक. या कुतुहलाने आजवर अनेक नवनविन शोधांना जन्म दिला. असं म्हट्ल जात कि गरज हि शोधाचि जननी आहे, पण मी अस म्हणेण कि कुतुहल हेच खरेतर शोधाचं कारण आहे किंवा असंही म्हणता येईल की, एखाद्या गोष्टीची गरज भासणे व त्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नाच्या परिणामांच्या कुतुहलातूनच नवीन शोधांचा जन्म होत असावा असो. अनेक प्रकारच्या कुतुहलाबरोबरच अगदी अनादि काळापासून मनुष्याला भविष्याविषयी कुतूहल आहे. भविष्याची ती अज्ञात दिशा त्याला नेहमी खुणावत आली आहे. प्रत्येक संस्कृतीतील व्यक्तिला भलेही ती आस्तिक असो अथवा नास्तिक प्रत्येकाला भविष्य जाणून घेण्याची ईच्छा आहे. आणि तो आपआपल्या परीने ते जाणून घेण्या विषयी प्रयत्न करत आला आहे. यासाठी कुणी कुंडली मांडतं, कुणी एखाद्या देव-देवर्षि यांच्या पाठी लागत, तर कुणी हाताच्या रेषा पाहतं, एकूण काय तर  या व इतर अनेक माध्यमातून मानव आपली जिज्ञासा शमविण्याचा प्रयत्न करत आला आहे. अलीकडे तर संमोहनाद्वारे गतायुष्य व भविष्य जाणून घेण्याच्या प्रयत्नाविषयी ऐकण्यात व वाचण्यात येत आहे. माणसाच्या या कुतुहलाने विविध शास्त्रांना जन्म दिला. जसे की फलज्योतिष, सामुद्रिक शास्त्र, रमल विद्या,टँरोट कार्ड इ. आणि यापैकीच एक आहे शकुन.
                   मुळात शकुन म्हणजे काय? तर शकुन म्हणजे एखादा संकेत जो तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या  एखाद्या घटनेविषयी पूर्वसूचना देतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ,संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग सर्वांना माहीत असावा.
 पैल तो गे काउ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे  
 म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी जर एखादा कावळा घरासमोर येऊन ओरडू लागला तर तो एखादा पाहुणा घरी येण्याचा संकेत समजला जाई. अशाप्रकारे पक्षांच्या, प्राण्यांच्या आवाजावरुन, कृतीतून वेगवेगळे शकुन ठरवले जात. आजच्या आधुनिक शास्त्रानेही ही गोष्ट मान्य केली आहे की भविष्यात येणार्या आपत्ति विषयी प्राण्यांना अगोदरच कल्पना येते. मागच्या काळात आलेल्या काही नैसर्गिक आपत्तीतील अनुभवांविषयी प्रत्येकाला ऐकून, वाचून अथवा पाहून माहिती असेलच, त्यामुळे ते सांगण्याची गरज नसावी. तर आपल्या पूर्वजांनी अशा प्रकारच्या संकेतातून भविष्यविषयक घटना जाणून घेण्याविषयी अनेक मार्ग शोधले. अनुभावातून ते आणखी प्रभावी होत गेले. ते वेगवेगळ्या ग्रंथात नमूद केले. काही गोष्टी पिढ्यांपिढ्या जपल्या गेल्या, आत्मसात केल्या गेल्या,नंतर त्या कुणीतरी लिहून ठेवल्या, जतन केल्या. आणि यातीलच एक म्हणजे सहदेव-भाडळी
            प्रत्येक संस्कृतीमध्ये शकुंनांना महत्व दिले गेले आहे. एखाद्या अगदी क्षुल्लक वाटणार्या घटनेतून आपल्याला भविष्यातील घटनेचा व त्याच्या  परिणामांचा बोध होतो तोच शकुन होय. जसं की , एखाद्या वेळी कुठलीतरी घटना घडण्या अगोदर आपल्याला अंतर्मनातून  काहीतरी जाणवतं व नंतर ती घडून गेल्यानंतर आपण म्हणतो की मला हे अगोदरच जाणवलं होत. एकूण काय तर आपलं अंतर्मन आपल्याला काही गोष्टींची पुर्वसुचना देतं. अगदी त्याच प्रमाणे निसर्ग सुदधा आपल्याला काही पुर्वसुचना देत असतो आणि ते म्हणजेच शकुन.
                                या ग्रंथात काय आहे हे तर आपण जाणून घेऊच परंतु त्याआधी सहदेव-भाडळी म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ. सहदेव व भाडळी हे दोघेजण सावत्र भाऊ-बहीण. त्यांची कथा अशी की,( ही कथा अरविंद सहस्त्रबुद्धे यांनी संपादित केलेल्या आवृत्तीत आहे.) सुमारे 700-750 वर्षापूर्वी पैठण येथे मार्तंड जोशी नावाचे ब्राम्हण राहत होते. त्यांची ही दोन मुले. सहदेव हा त्यांचा ब्राम्हण पुत्र तर भाडळी ही एका अंत्यज स्त्रीपासून झालेली मुलगी. लहानपणी सहदेव आपल्या वडिलांकडून ज्योतिष विद्या शिकत होता. तो शिकत असतानच त्याचे वडील एकाएकी वारले आणि त्याची विद्यासाधना अपुरी राहिली. म्हणून सहदेवाने गुरु शोधण्याचे ठरवले. पैठण नगरातच एक साधूपुरुष राहत होते सहदेव त्यांचेकडे गेला व त्याने त्यांना शिष्य करून घेण्याची व त्रिलोकज्ञान विद्या प्रदान करण्याची विनंती केली. त्यावेळी त्या साधूपुरुषांनी त्याला संगितले की तुला जी त्रिलोकज्ञान विद्या  हवी आहे ती  मलाही अवगत नाही. पण सहदेवाने हट्ट सोडला नाही. तेव्हा त्यांनी संगितले की या गावात अनेक समाध्या आहेत त्यात एका लिंबाच्या झाडाखाली माझ्या गुरुची समाधी आहे. तू ती समाधी शोधून, उकरून त्यातील माझ्या गुरुची कवटी काढ आणि रोज सकाळी नदीवर स्नान वगैरे उरकून, ती कवटी उगलून पित जा. त्यायोगे तुला त्रिलोकज्ञान विद्या प्राप्त होईल. त्यांनी सांगितल्या प्रमाणे सहदेव रोज सकाळी ती कवटी थोडी-थोडी उगाळून पिऊ लागला. एके दिवशी योगायोगाने भाडळीने हे पाहिले. तिच्या लक्षात सर्व प्रकार आला की, सहदेवाला ज्ञान कसे प्राप्त होत आहे ते. सहदेव निघून गेल्यानंतर तिने सर्व कवटी एकादाच उगाळली व पिऊन टाकली. त्यामुळे तिला त्रिलोकज्ञान प्राप्त झाले.  दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे सहदेव आपले नित्य कर्म उरकून कवटी ठेवलेल्या जागी गेला. पण त्याला कवटी सापडली नाही. तो पुन्हा त्या साधूपुरुषाकडे गेला व त्यांना कवटी नाहीशी झाल्याचे सांगितले. त्यांनी अंतर्ज्ञानाने सर्व जाणले व सहदेवास सांगितले की, तुझ्या प्रारब्धात होते तेवढे तुला मिळाले, व भाडळीला ती कवटी मिळाली व तिने ती सर्व एकाचवेळी पिऊन टाकली, त्या कवटीचा जास्त अंश तिच्या पोटात गेल्याने तिला सर्व विद्या प्राप्त झाली आहे. वरती असेही सांगितले की आता जर तुला ज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर उच्च-नीच, जात-पात विसर व तिचा शिष्य हो. सहदेवानेही तसेच केले. त्या दोघांमध्ये शास्त्रविषयक जी चर्चा झाली, तोच हा सहदेव-भाडळी ग्रंथ होय. ( यापेक्षा जराशी वेगळी कथा विकिपीडिया वरती आहे अवश्य वाचावी.)
                                  या कथेच्या सत्यासत्यतेत पडण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. कारण या ग्रंथात जी माहिती आहे ती त्याहीपूर्वीच्या पौराणिक ग्रंथांचा अभ्यास करून व अनुभवातून मांडलेली आहे. याला प्रमाण या ग्रंथाच्या मेघमाला विभागात पुढील ओळी आहेत,

  श्रीशंकर बोलीले  भवानीने ऐकिले
ते मृत्युलोकी आणिले  श्री व्यासांनी
ते होते संस्कृत  भाडळीने केले प्राकृत
सहदेवे ऐकिले निश्चित  उमजला मनी "

                              अर्थात असं की संस्कृतात असलेलं ज्ञान भाडळीने प्राकृत भाषेत आणून सामान्य जनांसाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे ही कथा रूपकात्मक समजली तरी हरकत नाही. त्यामुळे ना कथेच अलौकिकत्व कमी होत ना या ग्रंथाचं.  सहदेव-भाडळीची ही शास्त्रचर्चा पुढे कालांतराने शाहीर हैबतीबुवा यांनी काव्यात गुंफली जी आज सहदेव-भाडळी या ग्रंथरूपाने आपल्याला उपलब्ध आहे. या ग्रंथाशी माझा संबंध लहानपणीच आला. या ग्रंथाची अरविंद सहस्त्रबुद्धे यांनी संपादित केलेली एक आवृत्ती आमच्या घरी होती. मला या प्रकारच्या शास्त्रांत आवड होती की या ग्रंथामुळे ती निर्माण झाली हे मी सांगू शकत नाही. कारण विषयातील माझ्या परिचयात आलेलं पहिलं पुस्तक म्हणजे सहदेव-भाडळी. त्यानंतर अशा विषयातील अनेक पुस्तकात वाचनात आली, असो. कालांतराने मला घरात या ग्रंथाची अजून एक आवृत्ती सापडली जी खूप जुनी होती. पाने अगदीच जीर्ण झाली होती. सुरवातीची व शेवटची आणि कदाचित मधलीही काही पाने गहाळ झाली होती. कोपरे पार उडाले होते. पाने तर एवढी जीर्ण आहेत की थोडी जोरात पलटली तरी फाटतील. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि त्याच वाईटही वाटलं की या आवृत्तीत जेवढी विस्तृत माहिती दिली होती त्यापेशा खूपच संक्षिप्त माहिती नवीन आवृत्तीत होती. बहुतांश खूप काव्ये नव्या आवृत्तीत वगळली आहेत.
                                 हा ग्रंथ पुढे अनेक प्रकाशकांनी संपादित केला. त्यामुळे प्रत्येक आवृत्तीत थोडाफार फरक असू शकतो. पुढील माहिती ही अरविंद सहस्रबुद्धे यांनी संपादित केलेल्या आवृत्ती प्रमाणे आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या ग्रंथात ३२ विभाग आहेत. आताच्या नवीन आवृत्तीत ४० विभाग आहेत व त्याबरोबरच अवकहाडा चक्र, घात चक्र, गोत्रावळी, हे जादाचे विभाग आहेत. त्यावरूनच पुढील माहिती देत आहे.
     पहिल्या विभागात सहदेव भाडळीची कथा आहे. दुसरा विभाग पंचांग विषयक आहे. ज्यामधे तिथी,वार, नक्षत्र, योग करण यांची माहिती आहे. पुढील विभाग शक विषयक माहिती देतो. यात शालिवाहन शक, विक्रम संवत, सौरवर्ष, अयणे, अक्षांश-रेखांश यांची माहिती आहे. चौथा विभागात ग्रह व त्यांच्या राशी व त्यासंबंधी इतर माहिती आहे. यातच साठ संवत्सरांची नावे व त्याची माहिती आहे. पाचवा विभाग शिवलिखित पाहावयाचे कोष्टक हा आहे. ज्यायोगे दिवसभरातील शुभाशुभ योग समजतात. सहाव्या विभागात जन्ममहिना व त्याचे फळ सांगितले आहे. पुढच्या विभागात नक्षत्रांची गुणवैशिष्टे सांगितली आहेत. आठवा विभाग नक्षत्र व मानवी स्वभाव याची माहिती देतो. पुढील विभाग नक्षत्रावरून पिडादिवस, त्याच्या शमणार्थ उपाय, जन्मानक्षत्रावरून नाव, रास पाहणे, राशीवरून घातवार, घातनक्षत्र, घाततिथी यांची माहिती आहे. दहाव्या विभागात बारा राशी व शरीरातील अवयव यांचा संबंध यांची माहिती आहे. हे दहा विभाग नवीन ज्योतीष शिकणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहेत.
                           अकरावा भाग हा प्रयाण-विचार या नावाचा आहे.  यामध्ये प्रवासासंबंधी शुभाशुभ शकुनांची माहिती दिली आहे. त्याच बरोबर प्रयाणास शुभाशुभ तिथी, नक्षत्र वार, प्रहर यांची माहिती आहे. बारावा विभाग खुपच संक्षिप्त आहे. त्याचे नाव आहे प्रस्थान ठेवण्यास यात आपत्कालीन वेळी म्हणजे मुहूर्त पाहणे शक्य न झाल्यास करावयाचे नियम सांगितले आहेत. तेरावा विभाग आहे गर्भावळी. हे एकशे चोवीस ओव्यांचे एक काव्य आहे. यामध्ये गर्भलक्षण सांगितली आहेत. नऊ महिन्यातील गर्भाचा होणारा विकास कसा होतो हे संगितले आहे. एकदा अवश्य वाचावा. पुढचे दोन विभाग लग्नविचाराचे आहेत. यामध्ये विवाहमुहूर्त, त्यास योग्य व त्याज्य नक्षत्रे यांची माहिती आहे. सोळावा विभाग ऋतुफल व गर्भदान मुहूर्त यांसाठी आहे. सतरावा विभाग हिंदू धर्मातील संस्कार व त्यांचे मुहूर्त यासंबंधी आहे. अठरावा व एकोणविसावा विभाग आहे प्रश्नविचार". यामध्ये अंकगणितावरून प्रश्नांची उत्तरे जाणण्याची माहिती आहे.
  पुढचा विभाग आहे अंगस्फुरणाची फले व शकुनविचार आहे. कधीकधी आपले काही अवयव फडफडल्याचं जाणवतं उदा. डोळ्यांची पापणी फडफडणे. शरीरशास्त्रात वा वैद्यकशास्त्र यांत याची कारणे वेगवेगळी असतीलही , परंतु या अंग स्फुरणाच्या लक्षणावरून भविष्यातील शुभाशुभ घटनांची माहिती मिळते हा विचार आपल्या संस्कृतीत खूप पूर्वीपासून आहे   आणि त्याचाच विचार   या विभागात केला  आहे. 
                       पुढील विभाग स्वप्नविचार. अस म्हटलं जात की मनी वसे ते स्वप्नी दिसे". झोपताना आपल्या मनात जे विचार चालू असतात किंवा दिवसभरात जर एखाद्या गोष्टीविषयी आपण जास्त विचार करत असलो तर त्यांचे पडसाद  निद्रावस्थेत चित्र-विचित्र स्वप्नाच्या रूपाने प्रकट होतात. परंतु अशी स्वप्ने झोप चाळवतात आणि जाग आल्यानंतर ही स्वप्ने आपल्याला सहसा आठवत नाहीत. अशी स्वप्ने ही मनाचा खेळ समजली जातात. परंतु ज्यावेळी आपले मन शांत असेल व गाढ झोपेत एखाद्या समयी काही स्वप्ने पडतात व जाग आल्यानंतरही ही ती स्वप्ने लक्षात राहतात ती सूचक स्वप्ने समजली जातात. ही स्वप्ने आपल्या नजीकच्या भविष्यातील काही घटना वा एखाद्या कार्याच्या पूर्ततेविषयी सूचना देत असतात. त्यांचा विचार या विभागात केला आहे.
                       त्यापुढील विभागात पल्लीपतन, सरडारोहन यांची अवयवानुसार व प्रहरानुसार फले सांगितली आहेत. त्याचबरोबर होला (पक्ष्याचे नाव) शकुन फल, श्वान(कुत्रा) शब्द शकुन फल, काक (कावळा) शब्द शकुन फल व पिंगळा (पक्ष्याचे नाव) शब्द शकुन फल हे विभाग आहेत. यामध्ये वरील प्राणी व पक्षी यांचा आवाज, दिशा, प्रहर यावरून शकुन सांगितले आहेत.
      पुढील विभाग आहे मेघमाला, म्हणजेच पर्जन्यविचार. हा खरेतर या ग्रंथाचा मुळ गाभा म्हणावा लागेल. यामध्ये मेघलक्षन, महिन्यांवरून व नक्षत्र, ग्रह यांच्या नुसार पावसाचे भविष्य वर्तवले आहे. या मध्ये एक गोष्ट जाणवते  की भाडळीने यात ज्योतिष शास्त्रापेक्षाही हवामानाच्या अंदाजावरून पर्जन्यविचार केला आहे. जसे की, एखाद्या ठराविक महिन्यात किंवा ठराविक नक्षत्रातील मेघलक्षण व वार्याची दिशा व वातावरणातील अजून काही बदल यावरून भविष्यातील पावसाचे अंदाज सांगितले आहे. पूर्वी जेव्हा आधुनिक हवामान यंत्र उपलब्ध नव्हती तेव्हा जुनी-जाणती लोक आहेत ते अशाच प्रकारे पावसाचे अंदाज बांधत आणि ते तंतोतंत खरेही होत. आज सुसज्ज हवामान शाळा आहेत परंतु त्या हवामानविषयी म्हणावी अशी योग्य माहिती देवू शकत नाहीत.  
             पुढील विभागात विहीर, कूपनलिका यांच्यासाठी भूगर्भातील पाण्याचे झरे व त्यांचे स्थान जाणण्याचे शास्त्र आहे.  नंतरचा विभाग आहे वास्तुविज्ञान यामध्ये घर बांधण्याचे मुहूर्त, वास्तु बांधताना साधावयाचा आया याची माहिती आहे. पुढे गाय, बैल, कुत्रा, घोडा, कोंबडा या पाळीव प्राण्यांची पारख करण्याची लक्षणे सांगितली आहेत. पुढचा विभाग आहे कृषिकर्म विचार. यामध्ये शेतीविषयक कामाच्या मुहूर्तांची माहिती आहे, जसे की पेरणी,कापणी, मळणी इ. पुढे अनिष्ट ग्रहांचे उपाय सांगितले आहेत.
    त्यापुढील विभाग आहे यंत्रशास्त्र. हिंदू  आणि त्याबरोबरच जैन व बौद्ध संस्कृतीत तांत्रिक उपासनेत यंत्र शास्त्राला खूप पूर्वीपासून महत्व आहे. यंत्र म्हणजे काही बीजाक्षरे व अंकांचा वापर करून तयार केलेली एक साचेबद्ध आकृती. ही यंत्रे म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरस्वरूप मानली जातात. विशिष्ट देवतांची विशिष्ट यंत्र असतात उदा. "श्रीयंत्र" सर्वांना माहीत आहे जे श्रीलक्ष्मी पूजनात वापरले जाते. त्याच बरोबर एखाद्या विशिष्ट कार्यासाठी सुद्धा विशिष्ट यंत्र तयार केले जाते. यंत्र तयार करण्याचे व ते सिद्ध करण्याचीही एक विशिष्ट विधी असते. ज्यायोगे यंत्रांमधे त्या देवतेच आवाहन केले जाते. तर या ग्रंथामध्ये फक्त काही जी सामान्य लोकांना उपयोगी पडतील अशीच यंत्रे दिली आहेत.
             अशा प्रकारे जुन्या आवृत्तीत बत्तीस विभाग आहेत. नवीन आवृतीत मासाप्रमाणे भविष्यफल, शरीरलक्षणावरून भविष्य, शिंकेचे शुभाशुभ फल, रुद्राक्ष माहात्म्य, घरगुती आरोग्यविषयक औषधे, पत्रिकेवरून अवयव बोध, साडेसाती विचार, हे आठ विभाग मिळून चाळीस विभाग आहेत.
                                        तर असा हा ग्रंथ शेतकर्यांसाठी तर खूपच उपयोगी आहे परंतु त्याबरोबरच कामगार, व्यापारी, ज्योतिष आणि सामान्य लोक यांच्यासाठीही उपयुक्त आहे. या ग्रंथाविषयी अनेकांच्या मनात खूप गैरसमज आहेत. त्यासाठीच हा लेखनप्रपंच. काहीजण याचे मुखपृष्ठ पाहून हे एखाद्या तांत्रिक साधनेचे पुस्तक समजतात पण असे काही नाही. मुळात यंत्र विभाग सोडला तर याचा अशा साधनेशी काहीच संबंध नाही आणि त्यातही फक्त साधारण यंत्रे आहेत जी शेतकरी, व्यापारी यांना उपयोगी आहेत. यातील बहुतेक भाग हा शकुनविचाराचाच आहे. आताच्या  पिढीतील अनेकांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली या प्रकारच्या अनुभावातून उदयाला आलेल्या शास्त्रांना जाणून घेण्यात रुचि ठेवली नाही. अनेक जुन्या-जाणत्या लोंकांबरोबर कितीतरी अमूल्य गोष्टी इतिहास जमा झाल्या. प्रदीर्घ काळाच्या अनुभवातून व अभ्यासातून त्यांनी हे ज्ञान संपादित  केलं जे जतन होणे खूप गरजेचं आहे. आज ज्यावेळी आपण कुठल्याही ठिकाणी कामासाठी जातो तिथं वयाला नाही तर अनुभवाला प्राधान्य दिलं जातं. मग ही अनुभावातून निर्माण केलेली शास्त्र आपण काहीही जाणून न घेता धुडकाऊन का लावतो? जे अद्भुत तर आहेच पंरतू अलौकिक व अमूल्य आहे आणि मुळात मानवाच्या अफाट अनुभावातून जन्माला आलेली आहेत, हे काहीही म्हटलं तरी हे कुणीच नाकारू शकत नाही. एकवेळ यांत्रिक साधन वा उपकरण चुक करू  शकतं कारण त्याला काही मर्यादा आहेत पण निसर्ग कधी चुकत नाही. त्याच काम अव्याहत चालू आहे. कदाचित बदलत्या परिस्थितीनुसार काही नियम काही संकेत रद्दबादल झाले असतीलही, तर ते नव्याने अभ्यास करून ते अद्ययावत करावे लागतील. बदलत्या काळानुसार साधनेही बदलली असली पण त्यामुळे जुन्याला कमी लेखुन चालत नाही. कारण आयत्यावेळी तेच उपयोगी येत.
                             यात अजून एक महत्वाची गोष्ट जी आख्यानातून समजते ती म्हणजे सहदेव-भाडळी हे मूळचे महाराष्ट्रातीलच. त्यामुळे त्यांची निरीक्षणे ही इथलीच. त्या कारणाने त्यांचे पर्जन्य वा इतर संदर्भातील शकुन हे इथे जास्त लागू होतील. जरी आज आपल्याकडे नवनवीन उपकरणे उपलब्ध असली तरी हे स्वतः निसर्गाकडून मिळणारे संकेत जास्त ठळक असु शकतात. त्यामुळे यांचा अजून अभ्यास होणं गरजेचं आहे आणि हे अपूर्व ज्ञानाचं हे कुंड सदैव धगधगतं ठेवावं लागणार आहे.शकुनांचा हा वारसा काळाच्या ओघात लुप्त होण्यापासून जपावा लागणार आहे.
धन्यवाद.
         
-प्रदिप काळे (मुक्त कलंदर©)
  पंढरपुर
सहदेव भाडळी ग्रंथ मुखपृष्ठ                                  सहदेव भाडळी ग्रंथ  पहिले पान 



 हे सुद्धा अवश्य वाचा -  निळावंती : एक न उलगडलेले रहस्य
__________________________________________________________

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


                                
    
        

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप

'थोडंसं विषयाबद्दल '
            आजकाल सोशल मिडियाचा वापर खुपचं वाढला आहे. आपण तासन् तास त्यांच्या सोबत आहे. उठता-बसता, चालता-बोलता,खाता-पीता प्रत्येक ठिकाणी आता यांचच राज्य. जरी सोशल मिडियाने दुरस्थ संवादाला नवीन दिशा दिली असली तरी आपले वारू मात्र भरकटत चालले आहेत किंवा ते भलतीकडेच उधळत आहेत. या माध्यमांचा  दुरुपयोग वाढत चालला आहे.आज यांच्या मार्फत अनेक गुन्हे घडत आहेत. उदाहरणे अजुन ताजी आहेत.
              खरंतर आपल्याला  या गोष्टींचा वेळीच विचार करावा लागणार आहे की आपण यांच्या किती आहारी जायचं. या माध्यमांचा वापर किती व कसा करायचा हे शेवटी वापरकर्त्यालाच ठरवायचे आहे. शेवटी हि सारी माध्यमेच आहेत त्यांना आपण जसे वापरू तसेच ते वागणार आहेत.म्हणुनच या सोशल मीडिया'चा वापर दोघांनाही (माध्यम आणि वापरकर्ता ) 'सोसेल' एवढाच असावा. 
याच विषयावर ही पुढची कविता. यात जरी फक्त दोघांचा(फेसबुक आणि व्हॉट्सअॅप) उल्लेख असला तरी त्या बरोबर बाकीची माध्यमेही आलीच.
____________________________________________________________________

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ने अवघं आयुष्य बदलुन टाकलं
थोडंसं सुखद, सुसह्य; पण भलतंच अवघड केलं

दुरस्थ संवादाचा मार्ग जरी अजुन जवळ केला
आपुलकीचा ओलावा मात्र  मधेच कुठेतरी उडून गेला

भावनांची जागा "Feeling" ने घेतली, (सु)विचारांची जागा "Status" ने
हसतोही आम्ही "Smilies😂" ने , अन् रडतोही आता "emojis😢" ने

बाकी काही असो, अफवांचं पिक मात्र इथं जोमाने पिकतं
कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्ड च्या खताने क्षणाक्षणाला फुलतं

देवाच्या नावे धमक्यांचा तर रोजचा इथे दरारा
देवालाही ठाऊक नसेल, तो तरी काय करणार म्हणा बिचारा

साहित्य चोरांची तर भलतीच चंगळ आहे
लेखन एकाचं, माध्यम हे , अन् वाहवा! मात्र त्यांची आहे

आता या साऱ्याला  हे दोघेच जबाबदार कसे
यांच्या जोडीने Insta आलं, Tweeter आलं, बाकी सारे ही आले

सगळे कसे पहा एका माळेचेच मणी
पण ही दोन रत्नं मात्र Famous खरी

शेवटी काय हो, एकाच बापाची दोन्ही लेकरं
असेना का, एक स्वत:चं(FB) आणि एक दत्तकपुत्र(WA)

पण काही म्हणा झुकेशराव, तुमच्या लेकरांनी मात्र नाव काढले
बाकी सर्वांना मागं टाकुन, ते पुढे पुढेच राहीले

भलतंच वेड दिलंस तु आम्हा, आता काही सुटका नाही
वरचं सारं कळत असुनही, आता काही वळत नाही

अखेर ही सारी माध्यमच, चालक इथे दुसराच आहे
तो वापरेल तसं, चालवेल तसंच वागणं यांना भाग आहे

आता माझी ही कविता (त्यांच्यावरचीच) , मी त्यांच्याच हाती सोपवत आहे
पाहु पुढे काय होतं, शेवटी आपल्या हाती तेवढंच आहे
________________________________________
- मुक्त कलंदर© (प्रदिप काळे)
_______________________________________________________
©"All Rights reserved"
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.



वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected