Showing posts with label नारायण धारप. Show all posts
Showing posts with label नारायण धारप. Show all posts

रावतेंचा पछाडलेला वाडा.-ले. नारायण धारप व डॉ.अरुण मांडे.( अभिप्राय)



            मागे काही दिवसापूर्वी “Narayan Dharap- नारायण धारप  या नावाने नारायण धारप यांच्या चाहत्यांच्या फेसबूक पेजवर ही कथा वाचण्यास मिळाली. हे परीक्षण वगैरे नसून वाचक या नात्याने हा माझा या कथेविषयीचा अभिप्राय आहे. लेखकांनी लिहावं,परीक्षकांनी परीक्षण करावं तर वाचकाने त्या कथेचा वा साहित्याचा आस्वाद घ्यावा व त्या साहित्य प्रवासातील आपला अनुभव अभिप्राय स्वरुपात द्यावा अस मला वाटतं.
          आपल्या इथे भयकथा,गूढकथा,विज्ञानकथा,रहस्यकथा यांचा वाचकवर्ग म्हणावं तसा नाही आणि लेखक वर्गही कमीच. अलीकडे अनेक हिन्दी चित्रपटांमधून हा भयकथांचा विषय हाताळण्यात येतोय पण त्यातही मूळ कथानकापेक्षाही शृंगारीक प्रसंगावरच जास्त भर दिला जातो व याचच वाईट वाटतं. आणि काही दाक्षिणात्य चित्रपटातूनही हे विषय चांगले हाताळले गेले पण अलीकडे त्यांनीही भयपटाचे विनोदपट करून ठेवले. हॉलीवूडने मात्र या विषयात काही खूपचं अप्रतिम चित्रपट दिले जस की द कंजूरिंग सिरिज,द रिंग सिरिज, द एक्सोरसिस्ट सिरिज, इन्सीडुअस सिरिज किंवा मग अलीकडेच आलेला “it”. अजूनही भरपूर नावे सांगता येतील. त्याबरोबरच बाकी विषयातही त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. तिकडे या प्रकारचं लेखनही भरपूर झालं आणि वाचकवर्ग ही भरपूर आहे.  
          आपल्याकडे या लेखनाची कसर नारायण धारप,रत्नाकर मतकरी इ. दिग्गज लेखकांनी भरून काढली.अलीकडच्या आणि कदाचित आमच्याही पिढीला नारायण धारप हे नाव नवीनच असेल पण एक काळ त्यांनी आपल्या लेखनाने गाजवला होता. धारपांचा वाचकवर्गही मोठा आहे. धारपांच्या लेखणीच वैशिष्ठ्य म्हणजे, ते पात्र, स्थळ यांच्या वर्णनातून प्रसंग प्रत्यक्षं समोर उभा करत आणि एखाद्या भयप्रसंगाच्या वर्णनात कुठेही किळसवाणे वाटणारे वर्णन नसे पण तरीही तो प्रसंग तेवढाच परिणामकारक असे. आणि त्यांच्या कथांचा शेवट हा नेहमी सकारात्मक असे. दुष्टावर सुष्टाचा विजय, वाईटवर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय. आपल्याला नेहमी हॅप्पी एंडिंग ची आशा असते आणि तेच त्यांच्या कथांमध्ये असे.               
              आता या कथेबद्दल, ही धारपांची अपूर्ण राहिलेली कथा. नंतर डॉ. अरुण मांडे सरांनी ही पूर्ण केली, आणि “Narayan Dharap-नारायण धारप” या फेसबूकपेजवर पूर्वपरवानगीने ही कथा प्रकाशित करण्यात आली.एक भयकथा,गुढकथा व रहस्यकथा प्रेमी व त्यातही धारप प्रेमी त्यामुळे नारायण धारपांच्या जितक्या मिळतील तितक्या कथा वाचवयास मिळणे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट कुठली असेल.
              डॉ. अरुण मांडे सरांनी हे शिवधनुष्य अगदी सहज पेललं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे  या धनुष्याला प्रत्यंचा लावताना धनुष्य भंग न पावता प्रत्यंचाही अलगद बसवला. म्हणजेच कथेची लय कुठेही बिघडू न देता व धारप सरांच्या शैलीला कुठेही धक्का न लावता ही कथा पूर्ण केली. कुठल्याही दोन गोष्टींमध्ये तुलना करणे हा मानवी स्वभावच आहे. आपल्याही नकळत आपण आपण ती करू लागतो, पण खरेतर इथे ही कथा दोन लेखकांनी लिहल्यासारखे वाटतच नाही.मांडे सरांनी कथेला अगदी योग्य न्याय दिला आहे.
             आता धारप सरांच्या मनात या कथेचा काय प्लॉट होता हे कदाचित सांगता येणार नाही.पण मांडे सरांनी जो प्लॉट devlope केला आहे तोही खूपच उत्कृष्ट आणि धारप शैलीला साजेशा आहे. ही कथा मोजक्याच पात्रात रेखाटली आहे. ती कुठल्याही एका पात्राभोवती घुटमळत नाही तर प्रत्येक पात्राची आपली एक वेगळी ओळख आहे अगदी लहानग्या पारू म्हात्रेचीहि.
           या कथेतील वाड्याचे वर्णन मात्र अगदी उत्तम केले आहे. अगदी प्रत्यक्ष वाडा डोळ्यांसमोर उभा राहिला. त्याबरोबरच कथेतील पात्रांची इतर स्थळांची वर्णनेही बारीकतेने केली. इतर पात्राप्रमाणे वाड्यातील दुष्ट शक्तींच्या वास्तव्यामुळ वाडा ही एक पात्रच बनला आहे. वाड्यातील त्या शक्तीचा इतिहासही कुठेही अवास्तव न दाखवता अगदी मोजका पाहिजे तेवढाच सांगितला आहे. तसे पहिलं तर या कथेत शेवट सोडला तर मोजक्याच अमानवीय घटना घडल्या पण त्याही कथेवर छाप पाडणार्‍या व लक्षात राहतील अशाच आहेत. कथा कुठेही जास्त ताणून न धरता एकाच लयीत पूर्ण केली आहे आणि गतीही कुठे कमी वा जास्त होत नाही. इतर धारप कथेप्रमाणे या कथेचा शेवटही सकारात्मक झाला आहे हे विशेष. हे सगळे पाहता ही कथा अगदी उत्तम जमून आली आहे. बाकी जास्त काही लिहीत नाही कारण स्वतः कथा वाचण्याचा अनुभव हाही निराळाच असतो आणि तोच प्रत्येक वाचकाने घ्यावा.त्यामुळे वाचावीच अशी कथा आहे. शेवटी काय प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा भाग.

-मुक्त कलंदर(प्रदिप काळे). 
____________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected