रात्रीचा दुसरा प्रहर सुरू होऊन जवळजवळ एक घटिका उलटून गेली होती. सारी नगरी हळूहळू रात्रीच्या कुशीत विसावत होती. महालातील एक एक दिवा मालवू लागला. त्याने आज लवकरच सार्यांना निरोप दिला. संध्याकाळपासून तो एकटाच इथे दरबारात बसून होता. शून्यात हरवलेला... नव्हे गतकाळात. किती वर्षे उलटून गेली; अगदी एक एक वर्ष एक एक युगाच वाटावं तसं. तो अगदी शांत दिसत असला तरी मधेच त्याच्या चेहर्यावर एक हलकंस हास्य उयमटायचं तर कधी चिंतेची एक लकेर. त्यावेळी जर त्याला कुणी पा हिलं असतं ना तर न सांगताही त्याला त्याचा अवघा जीवनपट त्याच्या डोळ्यात दिसला असता. आयुष्यभराचा तो प्रवास त्याला आज या इथे घेऊन आला होता. कुणी प्रेमानं त्याला जवळ केल, कुणी मित्रत्वानं , कुणी शत्रुत्व दाखवलं... पण त्याने कधीच कुणाला दूर केलं नाही...त्याने कित्येक महान साम्राज्ये घडताना, कित्येक धुळीत मिळताना पाहिली. या युगातला सगळ्यात मोठा नरसंहार पाहिला... पण तो थकला नाही... हरला नाही... आणि आज तो इथे होता... अजून एक शेवटचा आणि सगळ्यात मोठा वार त्याला अजून झेलायचा होता.
महालातला शेवटचा दिवा मालवला तसा तो आसनावरून उठला, हळूच मागे वळून त्याने आपला राजमुकुट काढून सिंहासनावर ठेवला, आणि तसाच चालत बाहेर निघाला... मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पडताच समुद्राची गाज कानावर पडली... तसा तो त्या दिशेला वळला. आणि चालू लागला. एक शिपाई त्याच्याबरोबर निघण्यास तयार झाला पण त्याने त्याला हाताने तिथेच थांबण्याचा इशारा केला आणि तो एकटाच चालत निघाला. आकाशात चंद्र पूर्ण तेजाने झळाळत होता. पौर्णिमा जवळ आली होती. त्या प्रकाशात दूरवर समुद्राच्या लाटा दिसत होत्या. सावकाश चालत तो पाण्याजवळ येऊन उभा राहिला. समुद्राकडे पाहत. लाटा त्याच्या पायाशी खेळू लागल्या. समुद्रावरून शांत, खार्या वार्याची झुळूक वाहत होती. त्याचे केस त्या वार्याने उडू लागले. खूप वेळ तो दूर पाहत राहिला.
अचानक पाठीमागे कुणाची तरी चाहूल जाणवली. मागे वळून न पाहता तो उद्गारला...
“खूप उशीर केलास!”
तशी ती पावलं त्याच्या मागे अगदी काही अंतरावर येऊन थांबली. पैंजणांचा आवाज थांबला आणि काकणांच्या सळसळीबरोबर एका स्त्रीचा मधुर स्वर आला...
“उशीर? मी का… तू? काय म्हणू द्वारकाधीश…?
महाराज श्रीकृष्ण ? की अजून काही?”
तसा तो मागे वळला आणि म्हणाला...
“नाही राधे तुझ्यासाठी मी अजूनही कान्हाच आहे, तुझा कान्हा.... आणि खरंय तुझं, उशीर मलाच झाला आहे.”
समोर ती उभी होती... किती वर्षानी तो तिला पाहत होता... पण ती अजूनही अगदी तशीच होती. जणू काळाचा तिच्यावर काहीच फरक पडला नव्हता. अगदी जशी तिला त्या दिवशी शेवटची पहिली तशीच... किंचित गव्हाळपणाकडे झुकणारा गौर वर्ण... लंबगोल रेखीव चेहरा ,टपोरे पाणीदार काळेभोर मृगनयन... नक्षीदार भुवया… सरल तीक्ष्ण चाफेकळी नासिका; ज्यात साजेशी नथ, कमळालाही लाजवतील असे ओठ... ओठाच्या किंचित वर उजवीकडे एक तीळ, काळा-कुरळा दाट केशसंभार, त्यातील एक बट समुद्रावरून येणार्या वार्याने उडत होते... चेहर्यावर तेच मोहक हास्य... गालांवर पडणार्या खळ्या… नाजुक हनुवटी... कानात नाजुक कर्णफुले..आणि भ्रमरलाही भूल पडावी असा मनमोहक गंध...
तो फक्त पाहतंच राहिला तिच्याकडे आणि ती त्याच्या कडे अनिमिष नेत्रांनी…
चंद्राच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होत, अचानक दोघांनी आवेगाने एकमेकाला घट्ट मिठी मारली, तो आवेग इतका होता की तिच्या हातातील काकणांचा करकर आवाज झाला.
"थकल्या सारखा दिसतोयस. खूप बदल झाला रे तुझ्यात..."
तो फक्त हसला... मिठीतून बाहेर येत, त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं आणि किनार्याच्या कडेने चालू लागला. तीही त्याच्या बरोबरीने चालू लागली. खूप वेळ कुणीच काही बोलत नव्हतं. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला आणि दोन्ही हातात पकडून ह्रदयाशी कवटाळला आणि फक्त चालत राहिला... शेवटी तिनेच सुरुवात केली.
“आज इतक्या दिवसानी आठवण आली का माझी? की इतका तातडीचा निरोप पाठवून दिलास..?
“आठवण यायला विसरावं लागतं ना, राधे?”
ती क्षणभर काहीच बोलली नाही... मग अचानक उसळून म्हणाली..
“ मग न सांगताच का निघून आलास? त्या दिवशी तुझी वाट पाहत तिथे कालिंदीच्या काठावर बसले होते मी. पण किती वेळ झाला तरी तू आलाच नाहीस. पण मी तशीच थांबले. तेवढ्यात एक सखी आली आणि म्हणाली की तू आम्हां सर्वांना सोडून निघाला आहेस. माहीत आहे? तशीच उठून धावत पळत आले. पण तोवर तू रथामध्ये बसून निघालासुद्धा होतास. तिकडे यशोदा माई रडत होती, नंदबाबा तिला सावरत होते. सारा गोकुळ तुझ्या विरहाणे व्याकूळ होत होता आणि तू मागे वळूनही न पाहता तसाच निघालास. मी आवाज दिला, तुला तो ऐकुही आला असेल ना? पण तरीही तू अक्रुरकाकाला रथ हाकण्याचा इशारा केलास. आणि निघून गेलास. का कान्हा ? का? तुला साधा निरोपही द्यावासा वाटला नाही का रे? एकदा वळूनही पहावंसही वाटलं नाही?”
“राधे...” तो अजूनही शांतच होता.
“मी त्या दिवशी जर वळून पहिलं असतं तर मला गोकुळ कधीच सुटलं नसतं... आयुष्यात पुढे जे वाढून ठेवलं होतं, त्याला सामोरं जाणं ही काळाची गरज आणि नियती होती. मी आयुष्यभर ज्या एका तत्वाचा पुरस्कार करत आलो. त्यासाठी मला तो निर्णय घ्यावा लागला राधे.”
“ म्हणजे तुझ्या तत्वांपुढे मी कुणीच नाही? यशोदा माईचे अश्रु, नंदबाबाची माया, सार्या गोकुळवासियांच प्रेम हे सारं नगण्यच का? त्याची काहीच किंमत नाही? फक्त तुझी तत्वे, तुझे आदर्श, सारं तुझं , ज्यात मी कुठेच नव्हते का? वृंदावनात आपण व्यतीत केलेले ते क्षण, यमुनेच्या पाण्यातील तो नौकाविहार, कळंब वृक्षाखाली सार्या जगाला विसरून एकमेकांच्या मिठीत विसावून केलेलं हितगुज. सारंकाही विसरून तू निघून जावं इतकं ते नश्वर होतं का? ”
“ नाही राधे ... नाही. असं म्हणू नकोस. मान्य आहे की तुला अधिकार आहे मला जाब विचारण्याचा, पण मी आजतागायत काहीच विसरलो नाही. मला अजूनही ते अगदी काही वेळापूर्वी घडलं असावं इतकं लख्ख आठवतं. गोकुळ सोडून येणं, तुला न भेटता येणं हे माझ्यासाठीही तितकच अवघड होतं. तुला महितेय राधे या युगातला सगळ्यात मोठा नरसंहार मी या डोळ्यांनी प्रत्यक्ष पहिला आहे. कित्येक मातांना त्यांच्या पुत्रापासून, बहिणींना बंधुपासून, पत्नींना पतीपासून, कितीतरी लेकरांना त्यांच्या पित्यापासून, आणि प्रत्यक्ष माझ्याही स्वकीयांना माझ्यापासून दूर होताना मी पाहिलय. त्यांचा आक्रोश आजही मला ऐकू येतो. त्या जळणार्या चिता मला अजूनही डोळ्यासमोर दिसतात. वेदनेत तडफडणारे ते जीव अजूनही मला आवाज देताना दिसतात. मनात आलं असत तर मी हा नरसंहार रोखूही शकलो असतो, पण नाही राधे... नाही… तोही मला नाही टाळता आला. आणि खर सांगतो, या सगळ्या पेक्षाही गोकुळ सोडतानाचा तो क्षण माझ्यासाठी ह्रदयविदारक होता. काळजावर सहस्त्रावधी मणांच ओझ ठेऊन मी तो निर्णय घेतला होता. हो... मला ऐकू आली होती तुझी हाक. एकदा मनात आलंही की किमान एकदा... एकदा मागं वळून पाहावं, पण नाही राधे, मी त्यावेळी जर वळून पहिलं असतं तर मी स्वताला थांबण्यापासून रोखूच शकलो नसतो. मी तुला माझ्या जाण्याचा निरोप दिला नाही कारण मला ठाऊक होतं राधे की फक्त तू एकटीच आहेस जी मला माझा निर्णय बदलण्यास भाग पाडू शकतेस. आजही तो दिवस आठवला की मी झोपेतून जागा होतो, आणि रात्रभर फक्त छताकडे पाहत पडून राहतो.”
महालापासून दूर , समुद्राच्या अगदी जवळ ते दोघं बसले होते. तिने त्याच्या मानेवर हळूच आपलं मस्तक टेकवलं होतं आणि फक्त ऐकत राहिली ती. तिचा हात अजूनही त्याचा हातात तसाच होतं... पुन्हा खूप वेळ कुणीच काही बोललं नाही.
“मग तरीही तुला कधीच परत यावसं वाटलं नाही? एकदा येऊन पाहावं की राधा कशी असेल? कुठे असेल? काय करत असेल? एकदाही विचारपूस करावीशी वाटली नाही?”
“राधे, जरी मी तुझ्यापासून दूर असलो तरी मी तुझ्या जवळच होतो... आणि तू माझ्या...”
“ही फक्त म्हणायची गोष्ट झाली कान्हा.”
“नाही राधे, मी तुला बरं वाटावं म्हणून असं म्हणत नाहीये किंवा माझ्या सोडून जाण्याचं स्पष्टीकरणही देत नाहीये... जे आहे तेच मी बोलतो आहे. मी आजही तुझा, माझ्याशिवायचा दिनक्रम सांगू शकतो... त्या कदंबाखाली बसून मी जवळ नसतानाही तू माझ्याशी बोलत असायचीस... कारण तुला ठाऊक होतं राधे मी तिथेच तुझ्या जवळ आहे... राधे तू माझी सावली आहेस, माझं प्रतिबिंब आहेस तू, की ज्याला कुणीच कधीच दूर करू शकत नाही. जशी तुझी अवस्था तशी माझीही होती. आणि परत यायचं म्हणशील तर कितीतरी वेळा मी हे सारं काही सोडून येण्याचा विचार केलाही परंतु एक राजा या नात्याने हा पसारा सोडून येणं कधीच शक्य झालं नाही. त्या दिवशी उद्धव गोकुळाहून परत आला आणि अगदी रात्रभर मला तिथल्या गोष्टी सांगत होता. सार्यांना भेटला तो, फक्त तू त्याच्याशी काहीच बोलली नाहीस. त्याने फक्त दुरूनच तुला पाहिलं, तू आपल्याच जगात हरवली होतीस... एकटक यमुनेकडे पाहत बसली होतीस.”
“मला म्हणाला, माधवा, फक्त एकदा, एकदाच तिची भेट घेऊन ये रे... मला नाही पाहवत तिला असं.”
“मी त्याला त्यावेळी काहीच बोललो नाही. कारण तू माझ्यापासून, आणि मी तुझ्यापासून कधी दूर गेलोच नाही , हे मला माहीत आहे. आणि तुलाही...”
राधा हसली... म्हणाली... “हो कान्हा मला माहीत आहे ते... कळतय रे सारंकाही , पण कळत असूनही मन मानायला तयार होत नाही. मलाही कितीतरी वेळा वाटलं की एकदा तू मला येऊन प्रत्यक्ष भेटावस. एकदा तुझा आवाज कानावर पडावा. पुन्हा तुझ्या बासरीची धुन ऐकत तुझ्या मिठीत विसावावं. तू यायला हवं होतस कान्हा...”
“म्हणजे तुला मला जाब विचारता येईल हो ना? “ माधवाने उत्तर दिल.
“हो तेही आहेच म्हणा..."
तसे दोघेही अगदी खळखळून हसले...
“कान्हा किती दिवस झाले रे असं तुझ्या खांद्यावर डोक टेकवून शरीराबरोबरच मनाचाही भार तुझ्यावर सोपवून निवांत बसून राहण्याला, नाही? मी आज अगदी ठरवूनच आले होते, की तुला जाब विचारणारंच, पण मला वाटत तूही अगदी उत्तराची पुरेपूर तयारी करून आलेला आहेस.”
“हं... कदाचित...” तो हसला.
“आज असं अचानक का बोलवलंस पण...?”
त्याने काहीच उत्तर दिलं नाही.. फक्त तिच्या हातावरची पकड थोडी तिला घट्ट झालेली जाणवली, आणि त्याने सोडलेला एक उसासा...
“म्हणजे तू पुन्हा ..." तिला हुंदका दाटून आला.. पुढचे शब्द आतच अडकून राहिले... डोळ्यातून उष्ण धार वाहत त्याच्या खांद्यावर ओघळली... त्याच्याही डोळ्यातून काही थेंब त्याच्या हातातील तिच्या हातावर पडले.
“तू पुन्हा सोडून चाललास... हे बरोबर नाही कान्हा... अरे इतक्या वर्षाने तू आज भेटलास आणि तू पुन्हा एकदा विरहात ढकलून जाणार आहेस... नाही कान्हा नाही, यावेळी मी हे सहन नाही करू शकणार...”
तिचा स्वर कातर झाला, ती त्याला घट्ट बिलगली... समुद्र सुद्धा अगदी शांत झाला. वार्याने आपला वेग कमी केला... जणू सृष्टीही त्या क्षणी स्तब्ध झाली..
“यावेळीही माझ्या हाती काहीच नाही राधे... जरी मी ठरवलं तरी... हे टाळता येणार नाही... आज न उद्या हे घडणारच, नव्हे घडावं लागणारच...”
“मग पुन्हा कधीतरी हे घडू दे… आत्ताच का पण? आताशा तू पुन्हा मला मिळालास आणि तू पुन्हा सोडून जाण्याच्या गोष्टी करतोस... नको कान्हा नको... माझा असा छळ मांडून तुला काय मिळतं?”
“राधे तुला आठवतं? एकदा सायंकाळच्या वेळी आपण दोघेच नौकाविहार करत होतो, तू अशीच मला बिलगून बसली होतीस... एक हात पाण्यात बुडवून तू ते पानी माझ्या अंगावर उडवलस... आणि हसत राहिली... म्हणालीस.. किती शांत आणि सुंदर असतं ना हे पाणी... आपली तहान भागवतं , पिकांना, जंगलांना नवीन उभारी देतं... पशू-पक्षांची तहान भागवतं... कधीही आपल्याकडून परताव्याची अपेक्षा न करता... निरपेक्ष भावाने ते फक्त देत राहतं...”
त्यावेळी मी तुला काय म्हणालो आठवतं..?
“हं... तू म्हणाला होतास , हो राधे पाणी निरपेक्ष भावाने वागत असलं, कितीही शांत असलं, तरी कधीतरी त्याच्याही न कळत ते उग्र रूप धारण करून प्रलयाचंही कारण बनू शकतं. जसं हे पाणी जीवन देऊ शकतं तसं काही क्षणात एखादी सभ्यता भूतकाळात जमा करून टाकण्याची क्षमताही त्याच्यात आहे...”
“आणि तू फक्त हसून माझं बोलणं टाळलस...”
“त्याचा काय संबध ?”
“राधे तू समुद्राकडे पाहिलास? आज तो किती शांत आहे, आणि त्याचं पाणीही हळूहळू मागे मागे जात आहे ते...”
“हो रे माझ्या ते लक्षातंच...“ तीच वाक्य अर्धवटच राहिलं ...
तिने मान उचलली आणि कृष्णाकडे पाहिलं...
“नाही कान्हा...!”
“हो राधे...”
“त्या अठरा दिवसाच्या भिषण समरानंतर , दुर्योधंनाच्या चितेला अग्नि देताना त्याची माता गंधारी म्हणजे माझी आत्या, माझ्या जवळ आली. जिने अवघ्या अठरा दिवसात आपले शंभर पुत्र गमावले ती माता माझ्या शेजारी येऊन उभी राहिली... म्हणाली, का केशवा? का घडवलंस हे...? जर माझ्या आधीच त्यांना हिरावूनच घ्यायचे होते तर इतक्या पुत्रांच वरदान दिलेसच का मला, एकंच असता तर किमान त्या दुखाची तीव्रता जरा तरी कमी असली असती माधवा... एका मातेसाठी आणि एका पित्यासाठी, ज्यांना आपण जन्म दिला, तळहाताच्या फोडप्रमाणे जपलं, वाढवलं त्याच लेकरच्या चितेला अग्नि द्यावा लागवा, या सारखा दुसरं मोठं दुख नाही केशवा... मोठं दुख नाही... आणि इथेतर मी माझी एक नाही सारीच लेकरे गमावली रे... या शंभर पुत्रांना अग्नि देता देता मीही शंभर वेळा मरणयातना सोसल्या कृष्णा...मी स्वतः शंभर वेळा मृत्युला कवटाळून परत आले रे... हे अतीव दु:ख घेऊन मला जगता ही यायचं नाही आणि आत्महत्येच पातक मी करूही शकत नाही माधवा... का केलस असं माझ्या बरोबर... फक्त डोळ्याला पट्टी आहे म्हणून त्यांचे छिन्न-विच्छिन्न देह पाहू शकत नाही, पण जे ऐकलं त्यावरून ती भिषणता मी या बंद डोळ्यांनी देखील अनुभवू शकते, कृष्णा...”
“मी फक्त ऐकत राहिलो... एका मातेचा तो आक्रोश, तिची वेदना. भले तिचे पुत्र कसेही असले, दुष्ट, अधर्मी, पातकी... परंतु मातेसाठी ते फक्त तिचे पुत्र असतात... तिच्या सांत्वनासाठी त्यावेळी माझ्या कडे काहीच शब्द नव्हते... नव्हे मी जर त्यावेळी तिला काही स्पष्टीकरण दिलं असतं तर एका मातेच्या प्रेमाचा, तिच्या मातृत्वाचा तो अपमान ठरला असता."
“त्यापुढचे गांधारी आत्याचे ते शब्द म्हणजे एक भविष्यवाणीच होती... अगदी अटळ... आणि ती जर मी टाळण्याचा प्रयत्न केला ना राधे तर एका मातेच्या शब्दाचा अपमान ठरेल . भले मी कितीही ठरवलं तरी तो त्या स्वाभिमानी आईचा अपमान ठरेल. आणि हे पातक मी नाही करू शकत. आणि मी कलंकित झालेलो तुलाही आवडणार नाही राधे.”
राधा फक्त ऐकत होती, डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या, कृष्णाचा खांदा त्या धारांनी ओलाचिंब झाला होता, परंतु न त्याला याचं भान होतं न राधेला.
श्रीकृष्ण पुढे बोलू लागला...
“गांधारी आत्याच्या चेहर्यावर त्यावेळी अनावर क्रोध प्रकट झाला होता... तिच्यापुढे बोलायची माझीच काय पण कुणाचीही हिम्मत झाली नसती... तो एका मातृत्वाचा आक्रोश होता, जो तिथे असलेल्या प्रत्येकाच्या काळजाला चिरत होता... ती पुढे बोलू लागली...”
“तू मनात आणलं असतंस तर तू हे थांबवू शकला असतास केशवा... पण नाही तू हे मुद्दाम घडू दिलंस आणि एक कुळसंहार घडवून आणलास, मला माझ्या पुत्रांपासून दूर केलंस... या वृद्ध, अंध माता-पित्याची काठी तू दूर सागरात भिरकावून दिलीस... वादळात भरकटलेल्या आमच्या नावेची तू वल्हेच हिरावून घेतलीस... नव्हे नव्हे या अंध, अशक्त देहातील प्राणच तू काढून घेतलेस, आता उरले आहेत ते केवळ हाडा-मांसाचे दोन बाहुले जे फक्त राहतील, जो पर्यन्त त्यांची माती होत नाही. हा महाविनाश तू वेळीच रोखला असतास तर हे पाहावं लागलं नसतं केशवा, आणि याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस, फक्त तूच.. माझा एका पुत्रशोकाने पीडित मातेचा तुला शाप आहे कृष्णा... की तूही तुझ्या स्वकीयांचा नाश तुझ्या डोळ्यांनी पाहशील, जसा माझ्या कुळाचा तू नाश घडवलास तसाच तुझ्याही कुळाचा सर्वनाश होईल... जे दुःख मी भोगत आहे ते तूही माझ्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने भोगशील...”
सगळीकडे एक शांतता पसरली होती, मध्यरात्र होऊन एक घटिका सरून गेली होती, समुद्राची गाजही कमी झाली होती... वारा मंद झाला होता हवेत गारठा वाढला होता... राधा फक्त शांतपणे ते ऐकत होती... तिला ठाऊक होतं की काही झालं तरी ती कृष्णाला थांबवू शकत नव्हती. आणि कृष्णालाही ठाऊक होतं की त्याच्याशिवाय राधा ही जगूच शकत नव्हती, पण ही भेट गरजेची होती, भले राधा-कृष्ण कधी वेगळे झाले नव्हते पण इतके वर्षे ते असे समोरासमोर भेटलेही नव्हते, आणि जर ही भेट टाळली असती तर पुन्हा कधीही भेट घेणं शक्य नव्हतं.
“राधे...? ऐकते आहेस ना?” कृष्णाने विचारले
“हम्...” राधेने भरल्या कंठाने फक्त हुंकार भरला...
“आता ती वेळ समीप आली आहे राधे, उद्या या वेळी ही जागा पाण्याखाली असेल. जी द्वारका मी अगदी मायेनं वसवली, विश्वकर्म्याणे हिला घडवताना थोडीशीही कुचराई अथवा दिरंगाई केली नव्हती, अगदी मला हवी तशी ही नगरी उभी केली. परचक्रापासून मी याचं संरक्षण व्हावं यासाठी सुदर्शन दिवस-रात्र याच रक्षण करत राहिले. परंतु इथले लोकच हिच्या नाशाचे कारण होतील हे कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. हे असंच होत आलं आहे राधे, कुणालाही परकीयांपेक्षा स्वकीयांपासून जास्त धोका असतो. इतिहास साक्षी आहे, एखाद्या बलाढ्य साम्राज्याच्या अंत एखादा शत्रू कधीच करू शकत नाही. त्या साम्राज्याच्या खर्या शेवटाला सुरवात तेव्हाच होते जेव्हा तिथलाच एखादा स्वकीय म्हणवणारा फितूर होतो. लोक म्हणतात की रावणाचा अंत रामाने केला, पण खर सांगू राधे रावणाचा अंताला कारण त्याचाच बंधु बिभिषण होता. कारण त्यानेच तर रावणाच्या मृत्यूच रहस्य रामाला सांगितलं.”
“असो , उद्या माझेही लोक असेच एकमेकांच्या जिवावर उठतील, आणि खर सांगू राधे मला ते पाहावणारंच नाही, पण मला ते पाहावं लागेल आणि त्याहीवेळी माझी भूमिका तटस्थ असेल जशी कुरुक्षेत्रावर होती. आणि मी ठरवलं आहे त्यानंतर स्वतः मी इथून दूर निघून जाईन. म्हणून तुला बोलावणं धाडल, किमान या शेवटच्या क्षणी तरी तुझ्या मिठीत पुन्हा तेच दिवस आठवत काही वेळ व्यतीत होईल. पुन्हा तो जुना काळ जागता येईल.”
“चल कान्हा आपण गोकुळात परत जाऊ, इथे जे होईल ते होवो, आपण पुन्हा त्या कालिंदीच्या तिराशी कदंबखाली जाऊन बसू. खूप गुजगोष्टी करू, पुन्हा एकदा नावेत बसून यमुनेच्या पाण्यात दूर पर्यंत जाऊ. वृंदावनात सारीपाटाचा तो अर्धवट डाव पुन्हा सुरू करू. त्या शांत , मनमोहक वनात आनंदाने बेभान होऊन नृत्य करू. पुन्हा तू तुझी बासरीचे सुर छेड, ज्याने सारे वृंदावन पुन्हा आनंदाने नाचेल. चल कान्हा .. चल…”
कृष्ण फक्त हसला…
“पुन्हा एकदा तू गोकुळवासियांचे दही- लोण्याचे माठ रिते कर... यावेळी कुणीच यशोदा माई कडे तुझी तक्रार करणार नाही... गोप-गोपींना घेऊन जुने खेळाचे डाव मांड. तुला हवं ते कर...”
“त्या तक्रारीत तर खरी गंमत होती राधे.”
“हो रे कान्हा , कुणीही कधी मनापासून तक्रार केली नाही. प्रत्येकीला वाटायचं की तू तिच्याच घरी चोरी करावी. जो जास्त तक्रार करी तू पुन्हा त्याच्याच घरी खोडी करायचा. म्हणून प्रत्येकजन चढाओढीने तुझी तक्रार करायची."
“तुला आठवत कान्हा एकदा कुणीतरी अशीच तक्रार केली म्हणून यशोदा माईने तुला उखळीला बांधून ठेवलं होतं, त्यावेळी सगळ्या गौळणी अक्षरश: रडल्या होत्या रे, प्रत्येकीने माईची समजूत काढायचा यत्न केला होता... पण अखेर माई काहीच ऐकून घेत नाही म्हणल्यावर , त्यादिवशी एकही गोपी जेवली नाही... शेवटी पुन्हा तो झाडांचा प्रसंग घडला आणि माईने तुला मुक्त केलं , तू सुखरूप आहेस हे कळालं तेव्हा कुठे सार्याजणी आनंदाने घरी आल्या, आणि मगच त्या जेवल्या.”
“हो ग राधे, प्रत्येकीचा जीव होता माझ्यावर."
“होता नाही कान्हा आहे , अजूनही त्या तेवढ्याच तुझ्यावर जीव ओवाळून टाकतात.”
“आणि तू?”
“तुला माझ्या तोंडून वदवून घ्यायचं आहे का?”
कृष्ण पुन्हा हसला.
“राधे… ते दिवस खरच खूप अविस्मरणीय होते, मला आजही गोकुळातील ते एकूण एक घर, रस्ते,बाजारपेठ, वृंदानातल्या वाटा, यमुनेचा काठ, सारे सवंगडी, गोपी सारं काही अगदी स्पष्ट लक्षात आहे. पण या सार्या फक्त आठवणीच राहतील , पुन्हा तो काळ जगणं शक्य नाही. आपण फक्त त्या आठवणीत रमू शकतो.”
“हो कान्हा खरंय...”
“कान्हा...! “ आपली नजर कृष्णाकडे करत राधा बोलू लागली...
“माझी एक शेवटची मागणी आहे पुरवशील...”
"मला माहिती आहे राधे ती काय आहे ते..."
तिच्या नजरेत नजर मिसळत कृष्णाने उत्तर दिले..
राधेने हळूच पापण्यांची एकदा उघड झाप केली... आणि चेहर्यावर तेच मनमोहक हास्य ...
कृष्णाने राधेचा हात सोडला आणि आपल्या कमरेला अडकवलेली बासरी काढुन हाती घेतली. राधेने एक लाल रंगाचं रेशमी वस्त्र सोबत आणल होतं, तिने ते उघडलं, त्यात एक मोरपीस होता. तिने ते वस्त्र स्वतःच्या हातांनी कृष्णाच्या मस्तकाभोवती बांधलं आणि मोरपीस त्यात खोवला.
राधेने एकदा मायेने बासरीवरून हात फिरवला...
“ही अजूनही आहे तुझ्याकडे?”
“हो राधे याच क्षणासाठी हिला अजून जपून ठेवली होती.”
कृष्णाने बासरी अधराशी पकडली, राधा त्याला घट्ट बिलगली... मग हळू हळू त्याने बासरीवर तान छेडायला सुरुवात केली ... सागराचे पाणी हळू हळू दूर जात होतं, समुद्राची गाज धीमी होत चालली होती... बासरीचे सुर सावकाश वातावरणात घुमू लागले...मागे दूरवर उद्याची काहीच कल्पना नसणारी द्वारीकानगरी त्या मोहित करणार्या धुनेवर गाढ निद्रिस्त होती... भविष्याची स्वप्ने रंगवत..., आणि उद्याची सारी काही जान असणारा तो जगत्-नियंता सार्या चिंता दूर सारून आपल्या प्रेयसीच्या मिठीत शांत पणे बासरीवर अखेरची धुन छेडत विसावला होता…
-----
-लेखक-
-मुक्त कलंदर (प्रदिप काळे-
---------------------
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.