साथ दे तु मला...

साथ दे तु मला, नयनातील आसवांपरी
सुख-दु:खातील त्या नाजुक टपोर्या थेंबापरी

गीत माझ्या मनातले मी, कोरले या ह्रदयावरी
जपुन ठेव तु ते इतुके , तुझ्या डोळ्यातील स्वप्नापरी

जपल्या मी आठवणी, इतुक्या माझ्या मनी
जपशील का तुही त्या, तुझ्या ओठातील स्मितापरी

रात स्वप्नांचीही आता, नशीबी माझ्या न राहीली
चांदण्या मोजु बघता, त्यांस लपवीले काळ्या नभांनी

भेट आता एकदाची, उन्हातल्या सावलीपरी
गीत गाऊ दोघे मिळुनी, कोरले जे  ह्रदयावरी

-प्रदिप काळे(मुक्त कलंदर)
______________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

आज तु आठवलीस...


आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले
कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले.

खंत यासाठी की,
मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी
गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी
भीती नव्हती बोलण्याची,
हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची
भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही

अन् आनंदाचे यासाठी की,
आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस
अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस
ताल बिघडले मनाचे,
हो तालचं बिघडले मनाचे
कारण तु सुरचं घेऊन गेलीस

आता आजही शोधत असतो फक्त तुला,
कधी मोगर्याच्या गंधात
कधी फुलांच्या पाकळ्यात
कधी सागराच्या लाटेत
कधी चंद्राच्या चांदण्यात
तर कधी तार्यांच्या अंगणात

अन तु भेटतेसही मला
कधी एकांताच्या कोन्यात
कधी विरहाच्या तळात
कधी मौनाच्या शब्दात
कधी सुरांच्या मैफलीत
तर कधी या कवितेच्या पानात.

आज फक्त तुला आठवतो
कारण वेळ माझी केव्हाच गेली
पण वाट पाहतो तुझी आजही
कारण तुझी वेळ अजुन नाही गेली

कधीतरी तुला कळेलही
सुर माझा गवसेलही
शब्द माझा एेकशीलही
मागे वळुन पाहशील ही

मी उभा असेन तिथेच
जिथे तुला पाहीले
अन् शब्द माझ्या कवितेतील
जिथे पुर्वी हरवले

मी असेन तिथेच
वाट पाहत फक्त तुझी.

-मुक्त कलंदर (प्रदिप काळे).
_____________________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

शांत समय अन्...

शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती
न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती

धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी
अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई,
माझ्या कविता आणिक गाणी

शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट
उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट

ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ
पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ

दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला
अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला

असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती
बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती
                                    
 - मुक्त कलंदर© (प्रदिप काळे).
____________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©


उदास क्षण, उदास मन

संध्याकाळची वेळ होती,
मन एकदम उदास होतं
कशामुळे कशासाठी, काही माहीत नव्हतं

अशा या क्षणी काय करावे, कुठे जावे,
काही समजत नव्हते
मन उदासवाणे इकडुन तिकडे, फक्त भटकत होतं

विचारांच्या गर्दी पासुन दुर,
शांत ठिकाणी हरवत होतं
जणु मनाच्या या नगरीत , सुतकच पडलं होतं

जसजसा दिवस सरत होता,
तस तस मन अजुनच भरकटत होतं
ना बोलण्यात, ना एेकण्यात, कशातच मन लागत नव्हतं

विचारांपासुन दुर जावुन,
जणु विचार करणच सोडल होतं
का नि कशासाठी, काही समजत नव्हत

ना राग येत होता ना हसणं,
मन एकदम निश्चल दगडा प्रमाणे भासत होत
जगापासुन दुर कुठेतरी, आपल्याच नादात होतं

रात्री गडद अंधारात,
हळु हळु बुडुन जात होतं
कशामुळे कशासाठी, काही माहीत नव्हतं.

 -मुक्त कलंदर© (प्रदिप काळे).
_________________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

पहाट धुके २

नमस्कार.या ब्लाॅग वरती हि माझी दुसरी कविता. माझ्या पहिल्या कवितेचे नाव देखील पहाट धुके हेच होतं. दोन्ही कवितां मधे काहीही फरक नाही. फक्त शब्दरचनेत बदल आहे. फरकच नाही तर मग हि कविता लिहली कशासाठी असेहि वाटु शकते. तर निसर्गाचे अनेक अवतार आहेत, कधी शांत वाटनारा निसर्ग अचानक रौद्र रूप घेतो तर कधी इतका रम्य वाटतो की आपण याच्या प्रेमात पडतो. आणि अशा रम्य क्षणांच कितीही वर्णन केले तरी कमीच आहे. पहाटेची वेळ ही अशाच क्षणाच उदाहरण. शांत वारा, बोचरी थंडी आणि धुक्याची चादर खुपच सुंदर दृश्य, त्याच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. अलीकडे असे क्षण खुपच कमी अनुभवायला मिळतात, आणि तेच क्षण जर शब्दांमध्ये गुंफुन कविता केली तर ती वाचताना जो एक फिल येतो ना, की स्वत: तो क्षण अनुभवल्या सारखे वाटते. पुर्वी चौथीच्या अभ्यासक्रमात भा.रा.तांबेंची "सायंकाळची शोभा" या नावाची एक कविता होती,
"पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दुर"
या कवितेत सायंकाळच्या प्रसंगाच खुपच सुंदर वर्णन आहे. तशीच दामोदर अच्युत कारे यांची "झुळुक" ही कविता. या कविता आजही लक्षात राहतात. त्या वाचताना एक वेगळीच मजा येते. या कवितांपुढे माझी ही कविता म्हणजे काहीच नाही. तरीही ते क्षण टिपण्याचा हा एक प्रयत्न. हि कविता या पुर्वी मिसळपाव.काॅम इथे प्रकाशित झाली आहे.
धन्यवाद.
________________________________________________________
पहाट धुके २

धुंद सकाळी काढत वाट
चालत होतो धुक्यात
गर्द धुके हे जणु उतरले 
आकाशीचे नभ वनात


शुभ्र धुक्याचे जाळे पसरले
मोहुनी गेली पहाट
पाहण्या हा सोहळा धुक्याचा 
पाखरांची गर्दी दाट


किलबील किलबील गाऊ लागली
पाखरे मिळुनी सुरात
वनराईच्या देखाव्याने
भुलुनी गेलो सुखात


दवबिंदुच्या अोलाव्याने
भिजुनी गेली पहाट
किती नयनरम्य हा 
दिसे निसर्गाचा थाट


दाट धुक्यातुन शोधीत आली
सुर्यकिरण हीे आपुली वाट
आनंदाची सकाळ घेऊन 
आली धुक्याची पहाट.

      -मुक्त कलंदर© (प्रदिप काळे).
___________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

पहाट धुके

या अनुदीनी(Blog) वरती ही पहिलीच कविता आहे. यामध्ये वेगवेगळे रंग उधळणार्या निसर्गाच्या एका रुपाचे वर्णन आहे. अशी रम्य पहाट पुर्वी खुपवेळा अनुभवली, आणि अशाच एका पहाटे सुचलेली ही कविता.
       सुर्योदयाची वेळ होत आली आहे अंधुकसा प्रकाश आहे आणि सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहे, खरच किती विलोभनीय दृश्य असतं ते.असे वाटते की तो क्षण तिथेच थांबावा. थोडे अतिशयोक्ती वाटत असेल पण मला नेहमी असे वाटत आले आहे की, निसर्ग वर्णना मध्ये कधी अतिशयोक्ती होत नाही कारण त्याची किमयाच अशी असते की बोलण्यासाठी शब्दच सुचत नाहीत तर मग अतिशयोक्ती कुठुन करणार.
     तर असो, वरती सांगितले तसे किमयागार असलेल्या निसर्गातील एका दृश्याचे हे वर्णन आहे. हि कविता या पुर्वी मिसळपाव.काॅम या संकेतस्थळा वरती प्रकाशित झाली आहे.

          पहाट धुके

हिवाळ्यातील रम्य पहाट
धुक्यात हरवली वाट.
धुकेच जणु हे मेघ उतरले
पाहण्या सौंदर्याचा थाट.

सजली धरा ही सौंदर्याने
भुलले त्यासी धुके जणु हे
सापडेना धुक्याचा काठ
धुक्यात हरवली वाट.

हिरवळीस हे भुलले धुके
परतुनी जाण्या विसरले ते
सापडेना त्याला घाट
धुक्यात हरवली वाट.

सुर्यकिरण हे येता तेथे
भानावरती आले धुके
चालले सोडुन सौंदर्याशी गाठ
धुक्यात हरवली वाट.

   -प्रदिप काळे.

__________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected